पट्टणकोडोलीत क्रीडासंकुल उभे करू
By admin | Published: March 1, 2017 12:40 AM2017-03-01T00:40:50+5:302017-03-01T00:40:50+5:30
संभाजीराजे : राज्यस्तरीय वजनी गट कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन; ३५० मल्लांचा सहभाग
पट्टणकोडोली : पट्टणकोडोलीमध्ये कुस्तीला पूर्वीचे वैभव परत आणून कुस्ती जिवंत ठेवण्याचे काम येथील शिवराय व्यायाम मंडळ व एस. एम. ग्रुपच्यावतीने सुरू आहे. त्यामुळे राजकारण सोडून कुस्तीसाठी एकत्र येऊन सर्वांनी याठिकाणी ग्रामीण क्रीडासंकुल उभे करू, असे प्रतिपादन करून खासदार संभाजीराजे यांनी कुस्तीसाठी कायपण, असा नारा देत कुस्तीसाठी आपण अहोरात्र उपलब्ध असणार असल्याचे सांगितले.
पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे राष्ट्रीय तालीम संघ कोल्हापूरच्या मान्यतेने शिवराज व्यायाम
प्रसारक मंडळ व एस. एम. ग्रुप यांच्यावतीने ठेवण्यात आलेल्या राज्यस्तरीय वजनी गट कुस्ती
स्पर्धेवेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर उपस्थित होते.
यावेळी संभाजीराजे म्हणाले, पट्टणकोडोली नगरीत श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या पटांगणात पूर्वीपासूनच कुस्तीचे मैदान होते. शाहू महराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आहे. आपण ही कुस्ती मोठी करण्यासाठी प्रयत्न करून खासदार फंडातून शक्य ती मदत करणार आहोत.
स्पर्धेवेळी ५५ जुन्या मल्लांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला, तर स्पर्धेमध्ये ३५०
मल्लांनी सहभाग घेतला आहे. यावेळी सरपंच खाना अवघडे, उपसरपंच जयश्री कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शेळके, पोपट बाणदार, मदन चौगुले, साताप्पा भवान, आण्णा जाधव, निसार मुल्ला, राजू
सूर्यवंशी, राजू माने, सर्व समाजाचे अध्यक्ष, मंडळाचे कार्यकर्ते, स्पर्धक, पंच व ग्रामस्थ उपस्थित होते. गोगा बाणदार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्र्ताहर)
पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे राज्यस्तरीय वजनी गट कुस्ती स्पर्धेवेळी दोन मल्लांमध्ये खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. यावेळी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सरपंच खाना अवघडे, साताप्पा भवान, राजू सूर्यवंशी, गोगा बाणदार व पंच उपस्थित होते.