‘ईएसआय’ला मिळणार जीवनदान
By Admin | Updated: June 24, 2014 01:19 IST2014-06-24T01:15:16+5:302014-06-24T01:19:28+5:30
खासदार महाडिक यांनी उपक्षेत्रीय सहसंचालक सिंग

‘ईएसआय’ला मिळणार जीवनदान
कोल्हापूर : नऊ कोटी ५० लाखांचा खर्च, दहा वर्षे चाललेल्या बांधकामानंतर नागाळा पार्कमधील ईएसआयसी रुग्णालयाची इमारत उभी राहिली. मात्र, गेल्या १४ वर्षांपासून आरोग्य उपकरणांच्या प्रतीक्षेत असणारी ही इमारत धूळखात पडून आहे. याठिकाणी आवश्यक त्या सुविधांसह रुग्णालय सुरू करण्यातील अडथळे जाणून घेण्यासाठी खासदार महाडिक यांनी उपक्षेत्रीय सहसंचालक सिंग यांच्याशी चर्चा केली.
खासदार महाडिक यांनी रुग्णालयाची सद्य:स्थिती आणि येथील वैद्यकीय सेवा सुरू करण्याबाबत असलेल्या अडचणींबाबत सहसंचालक सिंग यांना विचारणा केली. यावर सिंग यांनी सांगितले की, पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरातही सर्वसामान्य विमाधारकांना त्यांच्या ‘हक्काची आरोग्य सेवा एकाच छताखाली’ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या रुग्णालयाची उभारणी केली. उत्तर प्रदेश राष्ट्रीय निर्माण निगमने (यूपीआरएन) या इमारतीचे बांधकाम केले. काही किरकोळ कामे बाकी राहिली असल्याने महानगरपालिकेने या इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखल दिलेला नाही. हा दाखल मिळाल्यास तातडीने ५० बेडचे रुग्णालय सुरू केले जाईल. त्यासाठी ११८ पदे मंजूर आहेत.
रुग्णालय सुरू झाल्यानंतर ‘ईएसआयसी’कडून त्याच्या विकासासाठीची समिती नेमण्यात येईल तसेच आवश्यक ती यंत्रसामग्री आणि अन्य सुविधांसाठी चार ते पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. बांधकाम पूर्णत्वाचा दाखल मिळविण्यासाठी आमचा ‘यूपीआरएन’कडे पाठपुरावा सुरू आहे.