Lok Sabha Election 2019 : ‘पोस्टल’ वेळेत न दिल्यास राहावे लागणार मतदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 02:00 PM2019-04-01T14:00:35+5:302019-04-01T14:02:34+5:30
निवडणुकीची ड्यूटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांकरिता पोस्टल मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने करून दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पोस्टल मतदानाचे फॉर्म भरून द्यावेत.
कोल्हापूर : निवडणुकीची ड्यूटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांकरिता पोस्टल मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने करून दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पोस्टल मतदानाचे फॉर्म भरून द्यावेत.
ते विहित वेळेत न मिळाल्यास स्वीकारले जाणार नाहीत, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी (दि. ३०) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिला. पोस्टलचे फॉर्म वेळेत न दिल्यास संबंधितांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे.
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणीसह मतदार जागृती असे विविध कार्यक्रम आतापर्यंत घेण्यात आले.
तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसह निवडणुकीची ड्यूटी बजावणारे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. निवडणुकीच्या कामानिमित्त पोलीस व निवडणुकीतील कर्मचारी बाहेरगावी जातात; त्यामुळे मतदानाचा हक्क बजावताना अडचणी होतात. यासाठी आतापासूनच पोस्टलचे फॉर्म घेऊ न ते लवकरात लवकर निवडणूक विभागाकडे सादर करावेत. जेणेकरून नंतर धावपळ होणार नाही. हे फॉर्म विहित वेळेत न आल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना बजावले आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, सहायक निवडणूक अधिकारी सचिन इथापे, सहायक निवडणूक अधिकारी अमित माळी यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.