कोकिसरेतील महालक्ष्मी मंदिराचे टाळे काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:28 AM2018-08-06T00:28:13+5:302018-08-06T00:28:29+5:30
वैभववाडी : कोकिसरेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा पुजारी बदलण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकलेले टाळे अज्ञाताने शनिवारी काढले. मात्र, हे टाळे गुरव गटाने काढल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पोलिसांत धाव घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु, देवस्थान हा विषय आपल्या अखत्यारित नसल्याचे स्पष्ट करीत पोलिसांनी कोकिसरे ग्रामस्थांना तालुका दंडाधिकारी यांचा मार्ग दाखविला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आज, सोमवारी तहसीलदारांची भेट घेणार आहेत.
श्री महालक्ष्मी देवस्थानच्या मालकीचा वाद न्यायालय प्रविष्ट असून, कित्येक वर्षे बंद असलेले मंदिर उघडून वर्षभरापूर्वी दैनंदिन पूजापाठ सुरू करण्यात आले होते. दरम्यान, मंदिरात पुजाऱ्याकडून घडलेल्या कथित प्रकारानंतर ग्रामस्थांनी बैठक घेऊन पुजारी हटविण्याच्या मागणीसाठी २५ मे रोजी मंदिराला टाळे ठोकून तहसीलदारांना तसा अर्ज दिला होता.
तहसीलदार संतोष जाधव यांनी ग्रामस्थ व गुरव या दोन्ही गटांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मंदिर ही गावाची मालमत्ता असून, पुजारी नेमण्याचा तसेच बदलण्याचा अधिकार गावाचा आहे. त्यामुळे पुजारी बदलण्याबाबत एकत्र बसून गावाने निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. तसेच पोलीसपाटील व तंटामुक्त अध्यक्षांना मंदिराचे टाळे काढण्यास सांगितले होते. परंतु, मंदिराचे टाळे काढल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंदिराचे टाळे काढण्यात आले नव्हते.
दरम्यान, कोकिसरे ग्रामस्थांनी पोलिसांत धाव घेतली. सदरचे टाळे गुरव गटाने काढल्याचा आरोप तक्रार अर्जात केला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी मंदिराचा विषय आपल्या अखत्यारित येत नसून, तालुका दंडाधिकारी यांच्याशी संबंधित आहे. त्यांनी बंदोबस्ताच्या दृष्टीने आदेश दिले तर आपण त्याची व्यवस्था करू, असे सांगून बाकारे यांनी कोकिसरे ग्रामस्थांना तालुका दंडाधिकाºयांचा मार्ग दाखविला. यावेळी अनंत मिराशी, प्रभाकर वळंजू, विश्वनाथ मेस्त्री, रमेश गुरव, अनंत नेवरेकर, अभि मिराशी, नारायण गुरव, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दंडाधिकाºयांना ग्रामस्थ आज
भेटणार
महालक्ष्मी मंदिरातील पुजारी बदलण्याच्या मागणीसाठी मे महिन्यात आम्ही तालुका दंडाधिकारी यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार ग्रामस्थांकडून कार्यवाही सुरू असतानाच शनिवारी गुरव गटाने मंदिराचे टाळे उघडले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही ग्रामस्थ आज, सोमवारी तालुका दंडाधिकाºयांना भेटणार आहोत, असे प्रभाकर वळंजू यांनी सांगितले.