Maharashtra Election 2019 : राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 06:29 PM2019-10-21T18:29:08+5:302019-10-21T18:35:50+5:30
कोल्हापूर जिल्ह्यांतील दहा मतदार संघात अत्यंत ईर्षेने ग्रामपंचायत निवडणूकीला होते तसे मतदान सोमवारी विधानसभा निवडणूकीसाठी झाले. राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात ७८. ३२ टक्के इतके झाले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यांतील दहा मतदार संघात अत्यंत ईर्षेने ग्रामपंचायत निवडणूकीला होते तसे मतदान सोमवारी विधानसभा निवडणूकीसाठी झाले. राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात ७८. ३२ टक्के इतके झाले आहे.
मतदानास अजून तासाचा अवधी शिल्लक असल्याने किमान ७५ टक्के मतदान होईल असा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला. मागील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे मतदानादिवशी काय होते याची सर्वांनाच चिंता लागून राहिली होती परंतू दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने मतदार व उमेदवारांचाही उत्साह वाढला. जिल्ह्यांत किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता कुठेही अनुचित प्रकार अथवा दुबार मतदानाच्या तक्रारी झाल्या नाहीत.
जिल्ह्यांत दहा मतदार संघात १०६ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भाजपचे उपाध्यक्ष धनंजय महाडिक व शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक या सर्वांचीच राजकीय प्रतिष्ठा या निवडणूकीत पणाला लागली आहे.
गेली आठवडाभर रोजच दुपारनंतर पाऊस येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळच्या टप्प्यातच मतदान करावे असे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला व सकाळी सातपासूनच मतदान प्रक्रियेने वेग घेतला. सकाळच्या टप्प्यात गावोगावी वैरण, शेतीची कामे करण्यात लोक गुंतल्याचे चित्र दिसत होते.अनेकांनी अगोदर मतदान केले व मगच दैनंदिन कामासाठी लोक बाहेर पडले.
पाऊस सुरु झाला तर वृध्द, आजारी, दिव्यांग मतदारांना बाहेर काढणे शक्य होणार नाही म्हणून अगोदर त्यांना प्राधान्याने मतदानास आणण्यात आले. मतदारांना आणण्यासाठी सर्रास वाहनांचा वापर झाला. कांही ठिकाणी मतदान केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागत होता त्यामुळेही लांबच्या लांब रांगा लागल्या. तरुणांईसह महिला, वृध्द, ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजावल्यानेच मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. निवडणूकीत चुरस जरुर होती परंतू कुठेही तणाव नव्हता त्यामुळे लोकांनी निर्भयपणे येवून मतदान केले.