मैनुद्दीन मुल्लाकडून सोळा लाखाची प्रॉपर्टी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:58 PM2017-09-09T13:58:03+5:302017-09-09T14:03:08+5:30
कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरीप्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (वय ३४, रा. जाखले, ता. पन्हाळा) याचे ताब्यातून सोळा लाख किंमतीची वाहने, सोन्याचे दागिने सीआयडीने हस्तगत केली.
या गुन्ह्यात शुक्रवारी अटक केलेल्या हवालदार शंकर महादेव पाटील (५२) याच्या चिंचोली (जि. सांगली) येथील घरावर शनिवारी सीआयडीच्या पथकाने छापा टाकुन झडती घेतली. यावेळी बँक खात्यासह स्थावर मालमत्तेची महत्वपूर्ण कागदपत्रके हाती लागले आहेत. या गुन्ह्यातील शेवटचा संशयित सहायक फौजदार शरद कुरळपकर हा फरार आहे, त्याला लवकरच अटक केली जाईल. अशी माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीकांत पाठक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने १४ कोटी ३४ लाख ५१ हजार रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविल्याप्रकरणी सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षकांसह सात जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी सीआयडीने संशयित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहा. पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, पोलिस हवालदार दीपक पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे, शंकर पाटील यांच्यासह मोहीद्दीन मुल्ला याला अटक केली. घनवट, चंदनशिवे व त्याच्या सहकाºयांनी तपासासाठी मुल्ला याला वारणानगर येथे आणले.
येथील शिक्षक कॉलनीच्या बिल्डिंग नंबर पाचमधील रूममध्ये त्यांना आणखी ११ कोटी रुपये मिळाले. मैनुद्दीनच्या नावाखाली चोरी दाखवून घनवट व सहकाºयांनी ३ कोटी १८ लाख रुपये परस्पर घेतले तर सहा. पोलिस निरीक्षक चंदनशिवे व सहकाºयांनी ६ कोटी रुपये घेऊन ते नातेवाईक प्रवीण सावंत यांच्या बँक खात्यावर भरले. या सर्वांनी मिळून एकूण ९ कोटी १८ लाखांचा ढपला पाडला. चौकशीमध्ये त्यांनी या सर्व प्रकरणाची कबुली दिली आहे. मैनुद्दिनच्या ताब्यातून सोळा लाखांची प्रॉपर्टी सीआयडीने जप्त केली.
सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. शंकर पाटील हा सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्या राहत्या घराची शनिवारी झडती घेतली. त्याचा या गुन्ह्यामध्ये कोणता रोल होता याची माहिती पोलीस घेत आहेत. या गुन्ह्यातील शेवटचा आरोपी संशयित सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर हा फरार आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल असे पाठक यांनी सांगितले.