Maratha Reservation : कोल्हापूर : मराठा आंदोलन दहाव्यादिवशीही जोरदार, विविध गावांसह संघटनांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 05:26 PM2018-08-03T17:26:23+5:302018-08-03T17:33:08+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन शुक्रवारी दहाव्या दिवशीही जोरदार झाले. विविध गावांसह संघटनांनीही पाठिंबा देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन शुक्रवारी दहाव्या दिवशीही जोरदार झाले. विविध गावांसह संघटनांनीही पाठिंबा देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कोल्हापुरातील सरकार घराण्यांनीही मोटारसायकल रॅली काढून पाठिंबा दिला. तर सेनापती कापशी (ता. कागल) येथील ग्रामस्थांनी लॉँग मार्च काढून आंदोलनाला धार आणली. आरक्षणासाठी सरकारविरोधात निर्णायक लढ्याची गरज असल्याचे प्रतिपादन चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी यावेळी केले.
मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा पीआरओ असोसिएशनने सहभागी होऊन पाठिंबा दिला. (छाया : नसीर अत्तार)
आंदोलनस्थळी विविध गावांतील ग्रामस्थ, संघटनांचे कार्यकर्ते व राजकीय नेत्यांनी भेट देऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. दहाव्या दिवशीही हे आंदोलन जोरदारपणे सुरू राहिले. गावागावांतून भगवे झेंडे घेतलेले युवक रॅलीद्वारे जय भवानी, जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देत या ठिकाणी येत होते. या घोषणाबाजीने परिसर दणाणून निघत होता.
शुक्रवारी त्र्यंबोली यात्रेनिमित्त पहिले पाणी घेऊन येणाऱ्या नागरिकांसह महिलांनीही ‘पी ढबाक’च्या गजरात येऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा देत मराठा आंदोलनाचा आवाज बुलंद केला. दिवसभर दसरा चौक गर्दीने गजबजला आणि घोषणांनी दुमदुमत राहिला.
चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. प्रकृती अस्वास्थाच्या कारणासह अधिवेशनामुळे आपण यापूर्वी आंदोलनस्थळी आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यापुढे म्हणाल्या, लाखोंचे मोर्चे निघूनही सरकारला अद्याप जाग आलेली नाही. आरक्षणाबाबत त्यांच्याकडून चालढकल सुरू आहे. ते कधी देणार याबाबत काहीच सांगितले जात नाही; त्यामुळे सरकारविरोधात निर्णायक लढा उभारून आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत तो सुरू ठेवण्याची गरज आहे.
विविध गावे, संघटनांचा पाठिंबा
सकल मराठा मोर्चा आंदोलक, समस्त मुस्लिम आणि ग्रामपंचायत (केर्ली), नारायणराव मेढे तालीम मंडळ (सोमवार पेठ, कोल्हापूर), जनसंपर्क फौंडेशन, ग्रामपंचायत कसबा ठाणे, ग्रामपंचायत महाडिकवाडी, सिद्धगिरी दूध संस्था (कणेरीवाडी), गोशिमा, तमाम सकल मराठा (कणेरी, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, नेर्ली, तामगाव, विकासवाडी, कोगील), हिंदु युवा प्रतिष्ठान, कोल्हापूर जिल्हा पीआरओ असोसिएशन, आदी विविध गावे व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.
अर्थमुव्हर्स असोसिएशनचा पाठिंबा
या आंदोलनाला अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स असोसिएशन, कोल्हापूरतर्फे पाठिंबा देण्यात आला. यामध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सभासदांच्यावतीने मराठा आरक्षणासाठी इथून पुढीलही आंदोलनात सहभागी होण्याची ग्वाहीही देण्यात आली. यावेळी अध्यक्ष संजय नाळे, सचिव संजय चौगुले, आदींसह पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.