शेती उत्पादनाला गावातच बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:31 AM2018-02-12T00:31:08+5:302018-02-12T00:31:12+5:30

Market Product in Village | शेती उत्पादनाला गावातच बाजारपेठ

शेती उत्पादनाला गावातच बाजारपेठ

googlenewsNext


कोल्हापूर : कारागिरांना प्रतिष्ठा आणि शेतकºयांना बळ दिले, तरच देशाची अर्थव्यवस्था अधिक भक्कम होणार आहे. त्यादृष्टीने गावातील शेती उत्पादनाला गावातच बाजारपेठ मिळवून देणे, काळाची गरज असलेली सेंद्रिय शेती, अन्नधान्य उत्पादनाला प्रोत्साहन, विविध योजनांद्वारे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी मंत्रालय, सरकार पावले टाकत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिराज्य मंत्री कृष्णा राज यांनी रविवारी येथे केले.
कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरीमठातर्फे आयोजित ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. विश्वकर्मा कारागीर नगरीमधील या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, रायबरेली संस्थानचे बडेराजा कौशलेंद्रसिंह, आमदार अमल महाडिक, आदी प्रमुख उपस्थित होते. उत्साही वातावरणात कारागीर महाकुंभाचा प्रारंभ झाला. सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठाचे उद्घाटन स्वामी नारायण संस्थानचे स्वामी त्यागवल्लभदास यांच्या हस्ते, तर खाद्य महोत्सवाचे उद्घाटन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.
केंद्रीय कृषिराज्यमंत्री कृष्णा राज म्हणाल्या, आधुनिक व पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे आपली प्राचीन कला, कारागिरी मागे पडू लागली आहे. अशा स्थितीत होत असलेला हा कारागीर महाकुंभ एक आशेचा किरण आहे. पालकमंत्री पाटील म्हणाले, कल्पनेतील गोष्टी व्यावहारिक जीवनात आणण्याचे काम सिद्धगिरी मठाद्वारे होत आहे.
केसरकर म्हणाले, धर्म-विज्ञान एकत्र आल्यानंतर जे काही चांगले घडते त्याचे दर्शन सिद्धगिरी मठावर घडते. रसायनमुक्त अन्नधान्य ही संकल्पना राज्यात राबविणार आहे.
यावेळी अधिक कदम, रत्नेश शिरोळकर, ओमप्रकाश शेटे, यशवर्धन बारामतीकर, आदींचा सत्कार करण्यात आला. के. डी. राव. अंजली पाटील, बसंतसिंग, आर. डी. शिंदे, शीला रॉय, चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
विविध कलांचे दर्शन

मातीचे दागिने, गोमूत्रातून सोने वेगळे करणे, नदीतील शिंपल्यांपासून बनविलेले दागिने, तीन महिने दूध टिकविण्यासाठी साकारलेले उपकरण... अशा विविध कारागिरी, कलांचे दर्शन ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’मध्ये रविवारी घडले. या महाकुंभाला भाविक, नागरिकांनी गर्दी केली. सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’चा रविवारी शोभायात्रेने प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजता रायबरेली संस्थानचे बडे राजा कौशलेंद्र यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन झाले. महाकुंभात देशी गार्इंच्या स्पर्धा आणि प्रदर्शन भरविले आहे. यात बारा लिटर दूध देणाºया, अवघ्या दोन फुटांच्या ‘पुगनूर’ या गाईला पाहण्यासाठी शेतकºयांसह अनेकांनी गर्दी केली. त्यासह गीरचा नंदी लक्षवेधक ठरला.
नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी निधी
सिद्धगिरी महासंस्थानचे नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विविध कामांसाठी ८५ लाख, तर मठाच्या परिसरातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. या महासंस्थानमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यासाठी सहा लाखांचा निधी दिला जाईल, असे खादी व ग्रामोद्योगच्या डॉ. शीला रॉय यांनी सांगितले.

Web Title: Market Product in Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.