सदस्यांनी ‘व्हिजन’ ठेवून काम करावे : चंद्रकांतदादा पाटील-- शिवाजी विद्यापीठात विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 02:12 AM2017-11-26T02:12:52+5:302017-11-26T02:13:37+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी विद्यापीठ विकासाबाबत एक आराखडा तयार करावा,
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी विद्यापीठ विकासाबाबत एक आराखडा तयार करावा, त्याबाबत नवे ‘व्हिजन’ डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील कामकाजाची वाटचाल करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीमध्ये प्राचार्य, नोंदणीकृत पदवीधर, विद्यापीठ शिक्षक, संस्थाचालक, अभ्यास मंडळे आणि शिक्षक अधिसभा यात विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा तसेच अधिकार मंडळावर राज्यपाल नियुक्त सदस्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी येथील एका हॉटेलच्या हिरवळीवर पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील हे होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीत सर्वांनी एकोप्याने व विश्वासाने काम केल्यामुळे बहुमत मिळणार हे निश्चितच होते. डॉ. संजय डी. पाटील यांनी सर्वांना एकत्र करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नेतृत्वगुण दर्शविताना तिन्ही जिल्ह्यांत जागा वाटप करताना न्याय दिला, त्याचा परिपाक म्हणून हे विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. वाय. पाटील यांनी, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर निवडणुकीत वर्चस्व मिळवताना डॉ. संजय डी. पाटील यांनी दाखविलेल्या ऐक्याच्या कौशल्याबाबत कौतुक केले.
यावेळी आघाडीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राचार्य महादेव नरके यांनी केले. यावेळी महापौर हसिना फरास, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्रा. शंकरराव कुलकर्णी, अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, बाबा सावंत, प्रा. डी. यु. पवार, डॉ. डी. आर. मोरे, प्रताप ऊर्फ भैया माने, आदी उपस्थित होते.
विद्यार्थी हाच केंद्रबिंदू
आघाडीच्या माध्यमातून विविध अधिकार मंडळांवर सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्हीही जिल्ह्याला जागा वाटप करताना न्याय दिल्यानेच हे यश मिळवता आले. मतदारांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी आम्ही विद्यार्थी हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून पार पाडू, अशी ग्वाही विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांवर विजयी झालेल्या विकास आघाडीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. एल. जी. जाधव, प्रा. डी. यु. पवार, डॉ. डी. आर. मोरे, प्रा. क्रांतीकुमार पाटील, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, महापौर हसिना फरास, प्रा. अभयकुमार साळुंखे, डॉ. जे. एफ. पाटील, आदी उपस्थित होते.