वनमित्र संस्थेकडून ‘मिरवेल’ गाव दत्तक
By admin | Published: June 16, 2016 11:38 PM2016-06-16T23:38:06+5:302016-06-17T00:26:33+5:30
लोकांच्या विकासासही प्राधान्य : नैसर्गिक, पर्यावरणपूरक विकास होणार
जहॉँगिर शेख -- कागल --निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता या क्षेत्रांत सामाजिक कार्य करणाऱ्या येथील वनमित्र संस्थेने ‘नैसर्गिक पर्यावरणपूरक विकास’ या संकल्पनेतून चंदगड तालुक्यातील ‘मिरवेल’ हे पारगडच्या पायथ्याशी असलेले गाव दत्तक घेतले आहे. प्रायोगिक पद्धतीने या छोट्याखानी गावात ही संस्था विविध प्रयोग करून पर्यावरणपूरक नैसर्गिक विकासाद्वारे गावचा आणि गावातील लोकांचा विकास घडवून आणणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मेंढालेखा या गावाने वन विभागाच्या क्षेत्रात असूनही वनसंपदेच्या रक्षणाबरोबरच त्याचे संवर्धन करीत वनसंपदेच्या माध्यमातून गावाचा मोठा आर्थिक विकास केला आहे. एका बाजूला वनसंपदेतून उत्पन्नही आणि दुसऱ्या बाजूला वनसंपदेचे रक्षण-संवर्धन, अशी ही संकल्पना तेथे राबविली आहे. यातून प्रेरणा घेत वनमित्र संस्थेने मिरवेल या गावाची निवड करून प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. पारगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे चंदगड तालुक्यातील हे गाव महाराष्ट्र-गोवा सीमेवर आहे. या गावापासून गोवा राज्याची हद्द केवळ सहा किलोमीटर आहे. हे छोटे गाव आहे. गावातील लोकांच्या मालकीची जमीन अवघी चार एकर आहे. त्यामध्ये दोन एकर जिरायत, तर दोन एकर बागायत आहे. मात्र, गावच्या सभोवती वन विभागाच्या मालकीचे मोठे जंगल आहे. या जंगलाचा उपयोग वस्तू उत्पादनासाठी करून घेणे आणि त्यातून गावचा आर्थिक विकास घडवून आणणे, हे करीत असताना वनसंपदेला कोणताही धक्का लागू न देता उलट त्याचे रक्षण-संवर्धन करणे, असे हे नियोजन असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही यासाठी सहमती दिली आहे. गावातील नागरिकांनी संमती दिल्यानंतर आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे.
संस्थेचे अशोक शिरोळे, विक्रम चव्हाण, अमोल भुरले, मिथून कल्ले, राजू घोरपडे, काशिनाथ गारगोटे, बाळ जाधव, कैलास पाटील, लखन तुरगुडे, आदींनी गावाला भेटी देऊन प्राथमिक बैठका घेतल्या आहेत.