कोल्हापूरच्या बेटिंग विश्वात ‘मुरली’चीच धून

By admin | Published: March 26, 2016 12:09 AM2016-03-26T00:09:30+5:302016-03-26T00:09:42+5:30

शहरासह उपनगरांत पंटरांचे जाळे : सांकेतिक भाषेचा वापर; मुंबईपर्यंत कनेक्शन; बड्या धेंड्यांचा समावेश

'Murali' only in the betting world of Kolhapur | कोल्हापूरच्या बेटिंग विश्वात ‘मुरली’चीच धून

कोल्हापूरच्या बेटिंग विश्वात ‘मुरली’चीच धून

Next

कोल्हापूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारे कोल्हापुरातील क्रिकेट बेटिंगचे मुख्य केंद्र राजारामपुरी असून, येथून थेट मुंबईपर्यंत बेटिंगचे कनेक्शन सुरू आहे. मोबाईलवरून बेटिंग घेण्यासाठी शहरासह उपनगरांत पंटर पेरले आहेत.
राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सम्राटनगर येथील सावित्री अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकून ‘वर्ल्ड टी-२०’ स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणाऱ्या दोघा पंटरांना अटक केली. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह पाच ते सहाजणांचे आम्ही पंटर असून, त्यांच्या सांगण्यावरून बेटिंग घेत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यानुसार क्रिकेट सट्ट्याचा मुख्य सूत्रधार मुरलीधर जाधव यांचे मोबाईल कनेक्शन तपासले असता शहरातील अनेक बेडे धेंडे गळ्याला लागले आहेत.
राजारामपुरी ते मुंबई असे बेटिंगचे कनेक्शन असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बेटिंगच्या गुन्ह्यामध्ये आरोपींनी सांकेतिक भाषेचा वापर केला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, बेटिंगचे प्रशिक्षण आरोपी कोणाकडे घेतात, त्यांचे आणखी कोणाकोणाशी लागेबांधे आहेत, बेटिंगकरिता लागणारे भांडवल त्यांनी कोठून उपलब्ध केले, आणखी कोणाचा यामध्ये सहभाग आहे, आदी मुद्द्यांवर आरोपींकडे सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन बेटिंगसारख्या अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली आहे.
क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळण्यासाठी गांधीनगरमधील काही बड्या व्यापाऱ्यांचा सहभाग आहे. हे व्यापारी घरी बसून एजंटांद्वारे मोबाईलवरून सट्टा लावतात. येथील पंटरांचा मुंबईतील बुकीमालकांशी थेट संपर्क असल्याने राजारामपुरीतील केंद्रातून बेटिंगची सूत्रे हलविली जात आहेत. पोलिस रेकॉर्डवर आलेले पंटर शहरासह उपनगरांत विखुरलेले आहेत. कांही पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून क्रिकेट बेटींग चालविणाऱ्यांनी आपले बस्तान बसविले आहे. मात्र पोलिसांनी आता त्यांच्याविरोधात मोहिम उघडली असून मटका बुकी मालकांसह पंटरांचीही धरपकड सुरु आहे.

‘वर्ल्ड टी-२०’ क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर पैशांची लूट होऊ नये, गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी पोलिस ठाण्यांच्या हद्दीनुसार लॉज, हॉटेलसह अपार्टमेंटची झाडाझडती घेण्याच्या सूचना निरीक्षकांना दिल्या आहेत.
- प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक


गुन्हा दाखल होऊनही सुधारणा नाही
गतवर्षी मुरलीधर जाधव यांच्या टाकाळा येथील जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. ४०२ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड या क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असताना राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकला होता. याप्रकरणी मुरलीधर जाधव यांच्यासह त्यांच्या पंटरांवर गुन्हा दाखल केला. मात्र, जाधव यांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता; परंतु पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी बेटिंगचा म्होरक्या जाधव यांचा जामीन रद्द करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन (अपील) दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. कठोर कारवाई होऊनही सभापती जाधव यांच्यात सुधारणा झालेली नाही. त्यांचे अवैध धंदे सुरूच आहेत, हे आजच्या कारवाईवरून पुढे आले आहे.

Web Title: 'Murali' only in the betting world of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.