‘मित्र.. मित्र’ म्हणत माझा गणू मला सोडून गेला! प्रणवच्या आईचा आक्रोश---मुलं अशी बेदरकार का वागतात...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:54 AM2017-12-14T00:54:14+5:302017-12-14T00:55:51+5:30
कोल्हापूर : ‘तो अलीकडे मित्रांमध्ये जास्त वावरतो... कुणाची संगत करतो हे मला माहीत नव्हतं; म्हणून त्याला कोल्हापुरात न ठेवता गुजरातला बहिणीकडं पाठवायचं ठरविलं होत.
कोल्हापूर : ‘तो अलीकडे मित्रांमध्ये जास्त वावरतो... कुणाची संगत करतो हे मला माहीत नव्हतं; म्हणून त्याला कोल्हापुरात न ठेवता गुजरातला बहिणीकडं पाठवायचं ठरविलं होत. येत्या सोमवारी (दि. १८) गोकुळ शिरगावची यात्रा आहे. तिथे चार पैसे मिळवू आणि त्याला घेऊन जाईन, असं मी ठरवलं होतं हो...! पण मी त्याला सोडण्याऐवजी माझा गणूच मला कायमचा सोडून गेला...’ असा टाहो बुधवारी शोभना बिंद यांनी फोडला. मंगळवारी (दि. १२) त्यांच्या लाडक्या मुलाचा गांधी मैदानात किरकोळ वादातून खून झाला. एखादे कुटुंब उद्ध्वस्त होणे म्हणजे काय असते, याचीच अनुभूती त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर आली.
बिंद कुटुंबीय मूळचे गुजरातचे. गेल्या वीस वर्षांपासून ते कोल्हापुरात स्थायिक आहेत. शोभना यांना प्रणव व दीपक अशी दोन फुलांसारखी मुलं. त्यांचा पती मागच्या दोन वर्षांत काही न सांगताच निघून गेला आहे; परंतु मुलांमध्ये भविष्य पाहत त्या येईल त्या संकटाला तोंड देत उभ्या राहिल्या होत्या.
अनेक वर्षे गणेशमूर्तींचे फिनिशिंग करायचे काम त्या करायच्या. ‘त्यावेळी प्रणव लहान होता. दोन मूर्तींच्या मध्ये त्याला झोपवून मी दिवस-दिवसभर काम केले. नंतर मुलांना वेळ देता येईना म्हणून ते काम बंद केले व जत्रा-यात्रांतून खेळणी व इमिटेशनचे दागिने विकू लागले. त्यातून चार पैसे मिळत होते. आता कुठं चांगले दिवस आले होते तोपर्यंत देवाला ते बघवले नाही... माझं घर त्यानं मोडलं हो...’ असे त्या सांगत होत्या.
बिंंद कुटुंबीयांचे येथे कुणी नातेवाईक नाहीत; परंतु शोभना यांनी चांगल्या वागण्यातून मोठा गोतावळा जोडला आहे. रस्त्यांवर बसून खेळणी विकणाºया अनेक महिलांची बुधवारी त्यांच्या घरी रीघ लागली होती. शिवाजी पेठेतील पद्माळा उद्यानासमोर त्यांचा एका खोलीत संसार. मंगळवारी सायंकाळी त्या यल्लमाच्या ओढ्यावर गेल्या. थंडी होती म्हणून प्रणव आईला स्वेटर व बॅटरीही देऊन आला. त्यावेळीही त्यांनी त्याला ‘कुठे जाऊ नकोस... गल्लीत लग्न आहे, तिथे हळदीच्या समारंभाला जाऊन ये व घरी दीपकजवळ थांब,’ असे बजावले होते. साडेपाच वाजता तो ओढ्यावरून माघारी परतला व साडेसहाला त्यांच्या फोनवर निरोप आला. त्यात ‘तुमच्या मुलावर वार झाल्या’चे त्यांना सांगितले; परंतु त्यांना वाटले, प्रणव वाढदिवसाला जातो असे म्हणत आहे. त्यांनी ‘जाऊन लवकर ये’ असे सांगितले. परंतु मारहाण झाली आहे आणि सीपीआरला या म्हटल्यावर त्या मटकन बसल्या. दुकान तिथेच सोडून सीपीआरला धावल्या. तिथे पोहोचल्या तेव्हा सगळे संपले होते. त्यांचा गणू त्यांना कायमचा सोडून गेला होता...
प्रणव नागोजीराव पाटणकर विद्यालयाचा विद्यार्थी. दहावीत शिकत असताना आईचे आजारपण वाढल्याने त्याला शाळा (शिक्षण) निम्म्यात सोडावी लागली. त्यामुळे व्यवसायात आईला मदत करायचा. त्याचा जन्म गणेशचतुर्थीचा; त्यामुळे आई त्याला लाडाने ‘गणू’ म्हणायची.
‘माझ्या मुलाकडून काही चूक झाली असली तर त्याचा हातपाय मोडला असता तरी चालले असते. मी त्याला आयुष्यभर सांभाळले असते. मलाही ब्लड कॅन्सर आहे. मागच्या चार वर्षांपूर्वी शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले होते. उपचाराला पैसे नव्हते. तेव्हा मदतीसाठी आदिल फरास देवासारखा धावून आला. त्याने रेशनकार्ड काढून दिले व ‘राजीव गांधी आरोग्य योजने’तून उपचार झाले. त्यामुळे माझे आयुष्य वाढले. आता गणू हाताखाली आला होता. कामात सगळी मदत करत होता. आपण दोघं दोन-चार वर्षे चांगला व्यापार करू. चार पैसे जमा करून एक खोली घेऊन देते... आणि छोट्या दीपकला लहानाचा मोठा करू. माझं तरी आयुष्य आता किती दिवस राहिलं आहे, असे मी त्याला सारखं बजावत होते; परंतु नियतीनं हे सगळं घडू दिलं नाही.
मी देवाचे असे काय वाईट केलं हो की त्याने माझा आधार एकाएकी हिरावून नेला...?’ असा सवाल मनबधिर करतो. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंची धार सुरू असते. नियतीही एखाद्याच्या बाबतीत इतकी क्रूर का वागते याचे कोडे उलगडत नाही. मन बधिर होतं आणि डोळे ओले होतात... त्यांच्या घराच्या लोखंडी जिन्याच्या पायºयाही भेसूर वाटायला लागतात....
मुलं अशी बेदरकार का वागतात...?
कोल्हापूर : वय म्हणाल तर २२ ते २३ वर्षांचे.. आता कुठे आयुष्याची सुरुवात... चांगलं काहीतरी घडविण्याची... आईवडिलांचे नाव करण्याची धडपड सोडून किरकोळ वादाचं निमित्त होतं आणि दोन-चार मुलं चक्क हत्यारे घेऊनच बाहेर पडतात आणि आपल्याच ओळखीच्या एका प्रतिकार न करू शकणाºया तरुणाचा दिवसाढवळ्या खून पाडतात... हे धाडस येतं तरी कोठून व मुलं अशी बेदरकारपणे का वागतात, असा प्रश्न बुधवारी दिवसभर चिंतेचे काहूर माजवून गेला.
कॉलेजमधील असो की गल्लीतील वर्चस्ववादातून मंगळवारी सायंकाळी प्रणव सुभाष बिंद (वय १७) याचा गांधी मैदानात खून झाला. ज्यांच्यावर खुनाचा आरोप आहे, ते तिघेही पंचविशीतील तरुण आहेत. त्यांच्याकडून हे कृत्य बेभानपणे झाले आहे. ही एक घटना असली तरी अशा अनेक घटना रोजच आपल्या आजूबाजूला घडल्या आहेत. रस्त्यात गाडी आडवी मारली किंवा चुकून गाडीला धक्का लागला तरी तरुण चक्क गळपट्टी धरत आहेत. बागल चौकात काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग. एका कारने तरुणाच्या मोटारसायकलला मागून धक्का दिला. त्यामुळे त्या तरुणाची गाडी रस्त्यावर पडली. कारचालक कोकणातील होता. त्याच्यासोबत त्याची आईही होती. तो गाडीतून उतरला व त्या तरुणाचे चक्क पाय धरले; परंतु तो तरुण काही न बोलता फक्त डोळे रोखून पाहत उभा होता. तो कारचालक व त्याची आईदेखील गयावया करीत होती; परंतु त्याने काही न करताही त्याची इतकी दहशत वाटत होती की ते जाम घाबरले होते. असे प्रसंग रोजच कुठे ना कुठे घडत आहेत.
मुले बेदरकारपणे वागण्याची जी महत्त्वाची दोन-चार कारणे आहेत, त्यांमध्ये कुटुंबातील व पोलिसांचाही दरारा संपला, हे महत्त्वाचे कारण आहे. तरुण मुलं कुणाच्या संगतीत वावरतात, ती काय करतात याकडे पालकांचे फारसे लक्ष नाही. लक्ष असले तरी मुले आता जुमानत नाहीत. तिसरे सर्वांत धोकादायक कारण म्हणजे अशी काही कृत्ये करणाºया तरुणांना समाजात मिळत असलेला मानसन्मान... म्हणजे एखाद्या राजकीय पुढाºयाला किंवा कार्यकर्त्याला जेवढी किंमत मिळत नाही, तेवढी किंमत किंवा दरारा या तरुणांचा निर्माण होत आहे. कोल्हापुरात अशा कितीतरी मोटारसायकली आहेत, त्यांना नंबर प्लेटच नाही. त्यांवर दादा, साहेब, अण्णा असेच लिहिले आहे. एखादा खून किंवा मारामारी होते. त्यांच्यावर कारवाई होते. त्यातून सुटल्यावर विजेत्यांसारखा वावर असतो.
डॉ. पी. एम. चौगुलेंनी केलेली कारणमीमांसा
आता प्रत्येकास एकच अपत्य आहे. आपल्याला जे मिळाले नाही ते सगळे मुलास देण्याची पालकांत स्पर्धा आहे. त्यातून मुलांचे लाड होतात. मागितले की मिळते अशी त्यांची मनोभावना होते व एखादी गोष्ट मिळाली नाही की मग हे तरुण ते सहन करू शकत नाहीत. याला ‘फ्रस्ट्रेशन टॉलरन्स’ म्हटले जाते.
माध्यमे व मुख्यत: सोशल मीडियावरून सेक्स व हिंसा याबद्दलचा भडिमार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, त्याचाही परिणाम हिंसा वाढण्यात होत आहे.
एकत्र कुटुंब पद्धतीत एकमेकांना आदर द्यायची, वाटून घेण्याची वृत्ती होती. ती सवयच मोडल्याने एखाद्याने आपल्या आयुष्यात हस्तक्षेप केला तर ते मुलांना आवडत नाही.
बहीण-भाऊ, कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा हल्लीची पिढी मित्रांच्या जास्त आहारी गेल्याचे दिसते. त्यातूनही काही घटना घडत आहेत.