पाण्यासाठी वस्त्रनगरीत एकीची गरज, वारणा पाणी योजना : आंदोलनात राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:50 AM2018-03-16T00:50:40+5:302018-03-16T00:50:40+5:30
इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी,
इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, यासाठी इचलकरंजीत सुरू असलेले जनआंदोलन एकाच पक्षाचे होऊन राहिले आहे. मात्र, ते खऱ्या अर्थाने जनआंदोलन होण्यासाठी त्यामध्ये सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज निर्माण झाली आहे.
पंचगंगा नदीत पाणी असले तरी जानेवारी ते जून या कालावधीत ते दूषित होते. कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा करणाºया नळ योजनेची दाबनलिका सडल्याने तिला वारंवार गळती लागते. अशा परिस्थितीत पिण्याच्या स्वच्छ व पुरेशा पाण्यासाठी पुरवठा करणारी वारणा योजना हा एकमेव पर्याय राहतो. वारणा मंजूर करताना धरणामध्ये एक टीएमसी पाण्याचे आरक्षणही आहे.
तसेच या योजनेसाठी दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीत बंधारासुद्धा बांधण्याची तरतूद आहे.
अशा पार्श्वभूमीवर दानोळी अथवा वारणा काठच्या गावांना शेती सिंचन किंवा तत्सम वापराच्या पाण्यासाठी पाणी अपुरे पडणार नाही, याची खात्री शासनाकडून वारंवार देण्यात आली. विशेष म्हणजे इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणानेच वारणा नदीवरील पाणीपुरवठा योजना सुचविली आहे. जीवन प्राधिकरणामार्फतच या योजनेचा सविस्तर अहवालही तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीतसुद्धा वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांची वारणा नळ योजनेला विरोधाची असलेली भूमिका अनाकलनीय आहे. अशा स्थितीत इचलकरंजीतून वारणा पाणी जनआंदोलन समितीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी कोपरा सभा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर ही योजना मार्गी लागावी, यासाठी दोनवेळा मोटारसायकल रॅली काढण्यातआली.
आंदोलन समितीच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देताना नगराध्यक्षांसह भाजपचे नगरसेवक व काही पदाधिकारी उपस्थित होते. वास्तविक पिण्याचे पाणी ही समस्या सोडविण्यासाठी राजकारणविरहित आंदोलन होण्याची गरज आहे. जेणेकरून शासनालाही जाग आली पाहिजे. त्यासाठी मात्र शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची एकजुटीची आवश्यकता आहे
कोल्हापूरकरांसारखे एकजुटीचे आंदोलन हवे
काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनची योजना असो किंवा शहरांतर्गत रस्त्यावरील टोलला टोला लावण्याचे आंदोलन असो, कोल्हापूरकरांमध्ये त्यासाठी राजकारणविरहित एकजुटीने आंदोलन होते. अशाच आंदोलनाची गरज इचलकरंजीमध्ये होणे आवश्यक आहे. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये नगरपालिकेत झालेल्या एका कार्यक्रमावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी लोकांना हाक दिली होती. त्यावेळी पाण्याची तीव्रता नसल्याने आमदारांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता उन्हाळ्यात तरी आमदारांच्या या आवाहनाला शहरातील सर्व राजकीय पक्ष व संघटना प्रतिसाद देतात का, असाच सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे..