आता आॅलिम्पिकमधील सुवर्णपदकाचे ध्येय: तेजस्विनी सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 07:58 PM2018-04-15T19:58:37+5:302018-04-15T19:58:37+5:30
कोल्हापूर : प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात करिअरचा अपडाउन ग्राफ असतो. माझ्या डाउन ग्राफचा कालावधी थोडा अधिक होता. मात्र, सकारात्मक वृत्ती आणि सरावामुळे मी पुन्हा कॅमबॅक करून राष्ट्रकुलमध्ये पदकांची कमाई केली. हे यश मी देशासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या जवानांना अर्पण करते. सन २०२० मध्ये होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे, असे कोल्हापूरची ‘गोल्डन गर्ल’, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत-दरेकर हिने रविवारी सांगितले.
गोल्ड कोस्टमधील (आॅस्ट्रेलिया) राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्ण व रौप्यपदक मिळविल्यानंतर रविवारी दुपारी चार वाजता तेजस्विनीचे कोल्हापूरमध्ये आगमन झाले. विमानतळावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी तिरंगा हातात देऊन तिचे स्वागत केले. निवासस्थानी आल्यानंतर तेजस्विनी म्हणाली, सरावातील सातत्य, सकारात्मक वृत्तीच्या जोरावर मी राष्ट्रकुलमध्ये यश मिळविले. ही स्पर्धा माझ्या आॅलिम्पिकमधील वाटचालीतील एक टप्पा आहे. राष्ट्रकुलातील यशानंतर पुणे आणि मायभूमी असलेल्या कोल्हापुरात माझे जल्लोषी स्वागत झाले. पुणे येथे सैन्यदलातील जवानांना भेटल्यानंतर एक ऊर्जा मिळाली. दरम्यान, विमानतळ तेथून क्रीडाप्रेमींनी ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत तेजस्विनीच्या वर्षानगर येथील ‘तेज’ निवासस्थानापर्यंत दुचाकी रॅली काढली. या ठिकाणी रांगोळीची सजावट, फटाक्यांची आतषबाजी, फुलांच्या उधळणीमध्ये तिचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. तिची बहीण अनुराधा पित्रे यांनी तेजस्विनी आणि तिचे पती समीर दरेकर यांचे औक्षण केले. यावेळी तेजस्विनीच्या आई सुनीता सावंत, सासू कमल दरेकर, आजी सुनंदा शिंदे, मावशी शारदा मोहिते, रंजना कागले, अरुंधती पाटील, सुरेखा सरदेसाई, मामी मंगल घोरपडे, बहीण विजयमाला, दीपक घोरपडे, डॉ. राजेश कागले, राहुल चिक्कोडे, सुभाष रामुगडे, विजय अगरवाल, अजित चौगुले, अक्षय मोरे, सरदार पाटील उपस्थित होते. मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून तेजस्विनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
शिवचरित्रातून प्रोत्साहन
या राष्ट्रकुल स्पर्धेतील यश हे माझ्या लग्नानंतरचे पहिलेच यश आहे. यशासाठी सासर-माहेरच्या कुटुंबीयांचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरल्याचे तेजस्विनी हिने सांगितले. ती म्हणाली, या स्पर्धेसाठी जाताना मला माझे पती समीर यांनी ‘शिवचरित्र’ दिले होते. प्रत्येक सामन्यापूर्वी मी त्याचे वाचन केले. त्यातून बळ, प्रोत्साहन मिळाले. राष्ट्रकुलमध्ये पहिल्यांदा रौप्यपदक मिळविल्यानंतर राष्ट्रगीताची धून कानांवर पडली नाही. त्याची मनामध्ये खंत होती. त्यानंतर जिद्द आणि संयमाने कामगिरी करून सुवर्णपदकाचा वेध घेतला.
राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण कामगिरी करणाºया तेजस्विनीचा मला अभिमान आहे. ती नेहमी यशाच्या ध्येयाने कार्यरत असते. त्यामुळेच ती आदर्शवत आहे.
- समीर दरेकर, तेजस्विनीचे पती