स्वकष्टाचा पैसाच अर्पण करा

By admin | Published: April 17, 2015 12:53 AM2015-04-17T00:53:36+5:302015-04-17T00:55:39+5:30

शंकराचार्य : अंबाबाईच्या पालखीसाठी सुवर्ण संकलनास प्रारंभ

Offer a lending money | स्वकष्टाचा पैसाच अर्पण करा

स्वकष्टाचा पैसाच अर्पण करा

Next

कोल्हापूर : सत्य आणि संपत्तीचा दाता हा परमेश्वरच असतो. अन्य व्यसनांपेक्षा पैशांचे व्यसन अत्यंत वाईट, पण ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहार’ या उक्तीप्रमाणे देवीच्या सुवर्ण पालखीसाठी भाविकांनी स्वकष्टातून मिळालेलाच पैसा अर्पण करावा, असे आवाहन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती स्वामीजींनी केले.
गुजरी कॉर्नर येथे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या कार्यालयाचे उद्घाटन व सुवर्ण निधी संकलनाच्या प्रारंभप्रसंगी त्यांनी आर्शीवचन दिले. व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, रामराजे कुपेकर, भरत ओसवाल, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, के. रामाराव उपस्थित होते.
खासदार महाडिक म्हणाले, अंबाबाईच्या कृपाशीर्वादामुळेच मी खासदार झालो. देवीसाठी सोन्याची पालखी असावी अशी अनेक भक्तांची इच्छा होती. त्यासाठी मी पुढाकार घेतला आणि या संकल्पाला आता मूर्त स्वरूप येत आहे. अंबाबाईच्या या पालखीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
भरत ओसवाल यांनी सुवर्णनिधी संकलनाची व पालखी बनविताना होणाऱ्या पारदर्शक व्यवहारांची माहिती दिली. महेंद्र इनामदार यांनी कोल्हापूर क्षेत्राची माहिती दिली. प्रसन्न मालेकर यांनी सूत्रसंचालन केले.


‘देवस्थान’ला कानपिचक्या
या कार्यक्रमास श्रीमंत शाहू महाराज यांनी देवस्थान समितीच्या कार्यपद्धतीवर खेद व्यक्त केला. ते म्हणाले, अंबाबाई मूर्तीच्या पूनर्प्रतिष्ठापनेच्या त्रिशताब्दीनिमित्त ही सुवर्ण पालखी होत असताना दुसरीकडे देवीच्या संपत्तीचा ताळमेळ लागत नाही. तीनशे वर्षांपूर्वी संभाजीराजेंनी, राजर्षी शाहू महाराजांनी देवीसाठी दागिने, जमीन, पैशांची सोय करून दिली. आता त्यात भरभराट होणे अपेक्षित होते. हे का झाले नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शिवाय या संपत्तीचा वापर हा सर्वसामान्य जनतेसाठी झाला पाहिजे.


५सुवर्णनिधी संकलनाची सुरुवात अरुंधती महाडिक यांनी केली. त्यांनी ११ लाखांचे चोख सोने करवीरपीठाच्या शंकराचार्यांकडे सुपूर्द केले. त्यानंतर हुबळीतील सतीश शेट्टी यांनी ११ लाखांचे सोने, पुण्याच्या गोरख चिंचवाडे यांनी ५११ ग्र्रॅम सोने, भरत ओसवाल यांनी १५१ ग्रॅम, आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून १० तोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीसाठी निधी दिला. जवळपास दोन किलो सोने जमा झाले.

Web Title: Offer a lending money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.