...अन्यथा ‘भाजप’ ला मत नाही : पेन्शनर, गिरणी कामगारांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:19 PM2018-10-02T18:19:02+5:302018-10-02T18:21:28+5:30
कोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे ईपीएस पेन्शनधारकांना महिन्याला ३००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, तसेच मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा सरकारने लवकर जाहीर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेत भाजपला मत देणार नाही, असा इशारा पेन्शनधारक व गिरणी कामगारांनी मंगळवारी येथे दिला.
कोल्हापूर : कोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे ईपीएस पेन्शनधारकांना महिन्याला ३००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, तसेच मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा सरकारने लवकर जाहीर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेत भाजपला मत देणार नाही, असा इशारा पेन्शनधारक व गिरणी कामगारांनी मंगळवारी येथे दिला. बिंदू चौक येथील भाजप कार्यालयावर धडक मोर्चा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आमच्या भावना कळवाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्याकडे केली.
दुपारी साडेबाराच्या सुमारास लक्ष्मीपुरी येथील सर्व श्रमिक संघाच्या कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हातही जिल्ह्याच्या कानाकोपºयातून मोठ्या संख्येने पेन्शनर व गिरणी कामगार कुटुंबीयांसह मोर्चात सहभागी झाले होते. ‘नो कोशियारी... नो व्होट’, ‘घर नाही तर मत नाही’ अशा घोषणा देत आंदोलकांचा हा मोर्चा फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा चौक, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौकमार्गे राजाराम रोडवरील भाजप कार्यालयाकडे निघाला. दरम्यान, सबजेल येथे मोर्चाचे रूपांतर ठिय्यात झाले. या ठिकाणी ‘आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भाजपला मत नाही,’ अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला.
या ठिकाणी संदीप देसाई हे मोर्चाला सामोरे गेले. यावेळी सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी पंतप्रधान मोदींना पाठविण्यासाठीपेन्शनरांचे व मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यासाठी गिरणी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे दिले.
अतुल दिघे म्हणाले, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निवडणुकीपूर्वी ९० दिवसांत कोशियारी कमिटी लागू करून प्रश्न मार्गी लावला जाईल, असे सांगितले होते; परंतु साडेचार वर्षे उलटली तरी काहीच निर्णय झालेला नाही. ५८ लाख पेन्शनर या निर्णयावर अवलंबून आहेत. तसेच राज्यातील गिरणी कामगारांनाही अद्याप घरे मिळालेली नाहीत. सरकारकडे पैसे नाहीत असे नाही. त्यामुळे त्यांनी गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा जाहीर करावा. यासह पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास भाजप सरकारला मत मिळणार नाही.
संदीप देसाई म्हणाले, पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत श्रमिक संघातर्फे देण्यात आलेले निवेदन हे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविले जाईल. या मागण्यांबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून, शासनपातळीवर त्याचा पाठपुरावा केला जाईल.
आंदोलनात दत्तात्रय अत्याळकर, नारायण मिरजकर, अनंत कुलकर्णी, विलास चव्हाण, शांताराम पाटील, अमृत कोकितकर, रामजी देसाई, बाजीराव पाटील, आदींसह गिरणी कामगार व पेन्शनर सहभागी झाले होेते.
आमच्या वाटणीचे आम्हाला द्या
मुंबई ही कामगारांच्या परिश्रमाने सोन्याची बनली; परंतु ती आता बिल्डर लुटायला निघाले आहेत; त्यामुळे यातील आमच्या गिरणी कामगारांच्या वाटणीचे सरकारने द्यावे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही, असे अतुल दिघे यांनी सांगितले.
सरकारने निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावा
पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकारने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावा, आम्ही अच्छे दिनच मागायला आलो आहे, असे दिघे यांनी सांगितले.
पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी मंगळवारी सर्व श्रमिक संघातर्फे बिंदू चौक येथील भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पेन्शनर व गिरणी कामगारांच्या कुटुंबातील महिलांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.