...अन्यथा पणतीचे रूपांतर मशालीत : सकल मराठा समाजाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:38 PM2018-11-07T12:38:20+5:302018-11-07T12:41:29+5:30
शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास पणतीचे रूपांतर मशालीत होऊन याचा वणवा राज्यभर पसरेल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. तसेच शासनाच्या डोक्यात प्रकाश पडावा, यासाठी कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ येथे शेकडो दीप प्रज्वलित करण्यात आले.
कोल्हापूर : शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास पणतीचे रूपांतर मशालीत होऊन याचा वणवा राज्यभर पसरेल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. तसेच शासनाच्या डोक्यात प्रकाश पडावा, यासाठी कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ येथे शेकडो दीप प्रज्वलित करण्यात आले.
दीपावलीचे औचित्य साधून सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील जन्मस्थळी सायंकाळी सहा वाजता दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापुरातील कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ येथे दीपावलीनिमित्त सकल मराठा समाजातर्फे आयोजित दीपोत्सवामध्ये सुंदर रांगोळ्या काढून सर्वांचे लक्ष वेधले.(छाया : दीपक जाधव)
सुरुवातीला शाहीर दिलीप सावंत यांचा शाहिरी मुजरा झाला. नंतर वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, गुलाबराव घोरपडे, संभाजी जगदाळे, हर्षल सुर्वे, आदींच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीपोत्सव करण्यात आला. बघता-बघता काही वेळातच शाहू जन्मस्थळ शेकडो पणत्यांनी उजळून निघाले. फूल रांगोळ्यांनी परिसर सजला होता.
मराठा समाज आरक्षण व इतर मागण्यांसाठी ४० दिवस आंदोलन केले होते. १ सप्टेंबर २०१८ रोजी राज्य सरकारतर्फे शाहू जन्मस्थळ येथे लेखी आश्वासन दिले. त्याला दोन महिने पूर्ण झाले; पण सरकारने अद्याप कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही; म्हणून राज्य सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा, या भावनेने हा उपक्रम घेण्यात आल्याचे समन्वयकांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न १५ दिवसांत न मिटल्यास शाहू जन्मस्थळावर प्रज्वलित केलेल्या पणत्यांचे रूपांतर मशालीत होऊन याचा वणवा राज्यभर पसरेल, हे सरकारने लक्षात घ्यावे, असा इशाराही समन्वयकांनी यावेळी दिला.
यावेळी नगरसेवक मोहन सालपे, किशोर घाटगे, सचिन पाटील, स्वप्निल पार्टे, महादेव पाटील, शशिकांत पाटील, अवधूत पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह कागलवाडी मित्रमंडळाचे कार्यकर्ते रवींद्र रेडेकर, शशिकांत पाटील, मयूर पाटील, बबन कदम, गौरव पाटील, आदी उपस्थित होते.