पडद्यामागील ‘हाता’ने ‘पी. एन.’ यांचा विजय सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 11:34 AM2019-10-26T11:34:46+5:302019-10-26T11:39:09+5:30
मागील दोन पराभवामुळे यावेळची निवडणूक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची होती; त्यामुळे ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन घेऊन कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली होती.
कोल्हापूर : कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी ‘करवीर’मधून दणदणीत विजय संपादन केला. यामागे त्यांच्यासह कुटुंबाचे कष्ट आहेच; पण गेली दोन महिने पडद्यामागील जोडण्या लावत, त्या यशस्वी करून पाटील यांना गुलाल लावण्यापर्यंत राबणारे ‘हात’ अनेक आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, ‘करवीर’चे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, भारत पाटील-भुयेकर, अॅड. शाहू काटकर, बाळासाहेब मोळे, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील या प्रमुखांचा उल्लेख करावाच लागेल. ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन हातात घेत कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली आणि विजयश्री खेचून आणला.
राजकारणात यशस्वी व्हायचे असल्यास कुटुंबाची भक्कम साथ लागते, त्याचबरोबर विश्वासू कार्यकर्त्यांची ताकदही महत्त्वाची असते. पी. एन. पाटील यांनी आतापर्यंत विधानसभेच्या सहा निवडणुका लढविल्या; पण त्यांच्या भोवतीच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ कधी कमी झाले नाही. कार्यकर्त्यांसाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते; त्यामुळेच कार्यकर्तेही त्यांच्यासाठी जीवावर उदार होऊन मैदानात उतरतात. मागील दोन पराभवामुळे यावेळची निवडणूक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची होती; त्यामुळे ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन घेऊन कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली होती. गेली तीन-चार महिने ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे व त्यांच्या टीमने अतिशय नियोजनबद्धरीत्या बांधणी केली.
विश्वास पाटील यांचा गेली ३0 वर्षे ‘गोकुळ’च्या माध्यमातून मतदारसंघात संपर्क आहे; त्यामुळे कोणता गट जवळ येऊ शकतो; त्यासाठी कोणत्या क्लृप्त्या वापरल्या पाहिजेत, याचा ठोकताळा त्यांच्याकडे होता. महिला मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी वातावरण निर्मितीस सुरुवात केली. विरोधकांच्या आरोपाबरोबरच डाव प्रतिडावावर त्याच ताकदीने प्रहार करण्याची रणनीती त्यांच्या टीमने अतिशय चाणाक्षपणे हाताळली. महिनाभर तर घरदार सोडून अतिशय आक्रमकपणे प्रचारयंत्रणा यशस्वी केली. पराभव खंडित करत पी. एन. पाटील यांना विजयी गुलाल लागण्यात या टीमचे योगदान फार मोठे आहे.
जनतेमधूनच मोठा उठाव होता, आमदार पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचारयंत्रणा दिवसेंदिवस गतिमान करत गेलो. विशेष म्हणजे गावागावांतील कार्यकर्त्याने जीवाचे रान केल्याने मोठे मताधिक्य मिळाले.
- विश्वास पाटील (संचालक, ‘गोकुळ’)