‘महसूल’कडून पंचगंगा घाट साफ
By admin | Published: November 4, 2014 12:14 AM2014-11-04T00:14:55+5:302014-11-04T00:25:02+5:30
स्वच्छता मोहीम : अधिकाऱ्यांच्या हातात झाडू, केराची टोपली
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’च्या हाकेला साद देत आज, सोमवारी ‘महसूल’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून पंचगंगा घाट स्वच्छ केला.
सायंकाळी पाचच्या सुमारास महसूलचे सर्व अधिकारी व कर्मचारी पंचगंगा नदी घाट येथे एकवटले. प्रत्येकाच्या हातात झाडू व टोपली होती. अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली.
सायंकाळची वेळ असल्याने या ठिकाणी फिरायला येणाऱ्या लोकांची लगबग असते. अचानक सुरू
झालेल्या या मोहिमेकडे कुतूहलाने पाहत काही वेळातच या ठिकाणी
गर्दी झाली. अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बघता बघता परिसर झाडून चकाचक केला. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले, करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी धनंजय पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)