पानसरे हत्येचे गूढ उकलणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:51 AM2018-06-18T00:51:11+5:302018-06-18T00:51:11+5:30
कोल्हापूर/मुंबई : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारेच्या चौकशीसाठी महाराष्टÑ ‘एसआयटी’चे विशेष पथक रविवारी रात्री बंगलोरला रवाना झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे कर्नाटक ‘एसआयटी’च्या हाती लागले असल्याचे समजते. त्या अनुषंगाने हे पथक वाघमारेची चौकशी करणार आहे.
बंगलोर येथे ५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या केल्याची कबुली मारेकरी परशुराम वाघमारे याने कर्नाटक एसआयटीला दिली आहे. लंकेश यांच्यासह डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि कॉम्रेड पानसरे या तिघांच्या हत्येसाठी एकच शस्त्र वापरल्याचा पोलिसांचा अंदाज होता. गुन्ह्यातील गोळ्यांच्या फॉरेन्सिक अहवालाने याला दुजोरा मिळाला होता. लंकेश यांच्या हत्येची कबुली देणारा संशयित मारेकरी कर्नाटक एसआयटीच्या हाती लागल्याने आता अन्य गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता बळावली आहे. त्यादृष्टीने तपास करण्यासाठी संशयित वाघमारेची चौकशी करण्यासाठी महाराष्टÑ एसआयटीचे पथक रविवारी रात्री बंगलोरला रवाना झाले.
कर्नाटकातील लेखक डॉ. कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकांशी आम्ही नियमित संपर्कात आहोत. तपासाच्या अनुषंगाने माहितीची देवाणघेवाण होत असते. कॉ. पानसरे आणि लंकेश यांच्या हत्येतील गोळ्यांचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप महाराष्ट्र एसआयटीला मिळालेला नाही. कर्नाटकातील तपासावर आमचे लक्ष आहे. पानसरे हत्येत सहभाग असल्याचा एकही पुरावा मिळाल्यास वाघमारेला ताब्यात घेतले जाईल.ह्ण असे महाराष्टÑ एसआयटीप्रमुख संजय कुमार यांनी सांगितले.
कोण आहे परशुराम वाघमारे?
परशुराम अशोक वाघमारे हा विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी गावचा रहिवासी आहे. आईवडील दोघेही मजुरी करून घर चालवतात. नावाला त्याने बीएससी डिप्लोमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. पण हिंदुत्ववादी विचाराने तो कमालीचा प्रेरीत झाला होता. हिंदुत्वासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी होती. त्यातूनच त्याने गौरी लंकेश यांची हत्या केली.
श्रीराम सेना सरसावली
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी परशुराम वाघमारेसाठी श्रीराम सेनेनं फेसबुकवरून आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. लंकेश यांच्या मारेकºयासाठी थेट हिंदुत्ववादी संघटनाच पुढे आल्याने अनेक तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.