पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’चे पथक पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:31 PM2018-08-21T12:31:55+5:302018-08-21T12:33:25+5:30
अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित वीरेंद्र तावडे मास्टर मार्इंड असल्याची माहिती ‘सीबीआय’च्या तपासात पुढे येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात औरंगाबाद येथील संशयित सचिन अणदुरेचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित वीरेंद्र तावडे मास्टर मार्इंड असल्याची माहिती ‘सीबीआय’च्या तपासात पुढे येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात औरंगाबाद येथील संशयित सचिन अणदुरेचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने ‘एसआयटी’चे पथक पुण्याला माहिती घेण्यासाठी सोमवारी रवाना झाले. दुसरीकडे शरद कळसकर अणदुरेच्या कोल्हापुरातील कनेक्शनच्या माहितीसाठी दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) कोल्हापुरात दाखल झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
नालासोपारा येथून अटक केलेला संशयित वैभव राऊत याच्या संपर्कातील संशयित शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर या तिघांना पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली. त्यानंतर औरंगाबाद येथून अणदुरेला अटक केली.
अणदुरेने दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे. तावडे हा दाभोलकर हत्येतील मुख्य संशयित आहेत. नालासोपारा येथील वैभव राऊत व शरद कळसकर हे दोघे वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करीत; पण ते चांगले मित्र आहेत.
संशयित कळसकर हा चार वर्षे कोल्हापुरात लेथ मशीनवर काम करीत होता. कळसकर बरोबर वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर हेही कोल्हापुरात येऊन गेले असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. त्यामुळे याची माहिती काढण्यासाठी तसेच अणदुरेचे कोल्हापूर कनेक्शन आहे का? या सर्वांचे एकमेकांशी असलेल्या संबंधांचे काम हे पथक करणार आहे.
दरम्यान, पानसरे यांच्या हत्येत अणदुरेचा सहभाग असल्याचा संशय ‘एसआयटी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे अणदुरेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’चे एक पथक पुण्यातआहे. अणदुरेने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्र आणि कर्नाटकात घेतल्याची माहिती तपासात समोर येत आहे.
कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील संशयितांनी बेळगावजवळ हत्यार चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती उघड झाली आहे. त्यादृष्टीने अणदुरेचा संबंध आहे का? याची माहिती ‘एसआयटी’कडून घेतली जात आहे.