राजापूरच्या गंगेचे विक्रमी वास्तव्य, प्रवाहाला पुन्हा जोर
By admin | Published: July 24, 2014 11:09 PM2014-07-24T23:09:44+5:302014-07-24T23:13:07+5:30
भाविकांचे श्रध्दास्थान : तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा भर पावसात प्रवाहीत
विनोद पवार -राजापूर ,,साधारण दर तीन वर्षांनी प्रकट होणारी राजापूरची गंगा गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणात अखंडपणे प्रवाहीत होती. मंगळवारी गंगेचा प्रवाह पुन्हा जोराने वाहू लागला आहे. निसर्गाचा अद्भूत चमत्कार मानली जाणारी राजापूरची गंगा महाराष्ट्राबरोबरच परराज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान बनून राहिली आहे.
गेले वर्षभर सातत्याने प्रवाहीत राहणारी राजापूरची गंगा गेल्या तीन वर्षांत तीन वेळा प्रकट झाली असून, हादेखील एक दैवी चमत्कारच मानला जात आहे. अनादी काळापासून दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या राजापूरच्या गंगेत स्नान केल्यानंतर मानवाच्या पापांचे क्षालन होते, असे भाविकांमधून मानले जाते.
राजापूरच्या गंगेच्या संदर्भातील सन १८८३ पासूनच्या उपलब्ध नोदींनुसार राजापूरची गंगा प्रकट होऊन अंतर्धान पावल्यानंतर साधारणत तिसऱ्या वर्षी पुन्हा प्रकट होते. असा प्रघात आहे.
राजापूरच्या गंगेच्या बाबतीतला हा प्रघात सन २००९ पर्यंत जवळजवळ कायम होता. २८ मे २००९ रोजी प्रकट झालेली राजापूरची गंगा सुमारे १०५ दिवस प्रवाहीत राहून ९ सप्टेंबर २००९ रोजी अंतर्धान पावली होती. त्यानंतर एक वर्ष पाच महिने उलटल्यानंतर म्हणजेच १० फेब्रुवारी २०११ मध्ये गंगेचे पुन्हा आगमन झाले. यावेळी गंगा ११६ दिवस प्रवाहीत राहून ५ जून २०११ रोजी अंतर्धान पावली. त्यानंतर दरवर्षी म्हणजेच सन २०११ , २०१२ व २०१३ या तीन वर्षी सातत्याने प्रकट झाली आहे. ५ जून २०११ रोजी अंतर्धान पावलेली राजापूरची गंगा केवळ दहा महिन्यांच्या कालावधीत ११ एप्रिल २०१२ रोजी पुन्हा प्रकट झाली. यावेळी गंगा अखंडपणे प्रवाहीत राहण्याचा कालावधी ३४७ दिवसांचा असल्याची व्रिकमी नोंद झाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात गंगा प्रवाहीत राहण्याचा कालावधी हा साधारणत तीन महिन्यांचा राहिला असला तरी ११ एप्रिल २०१२ रोजी प्रकट झालेली गंगा ३४७ दिवसांनी म्हणजेच २३ मार्च २०१३ रोजी अंतर्धान पावली. यावेळी अंतर्धान पावलेली गंगा नेहमीप्रमाणे तीन वर्षानी येईल, असे वाटत असतानाच केवळ तीन महिन्यांच्या कालखंडानंतर २३ जून २०१३ रोजी पुन्हा प्रकट झाली ती कधी अंतर्धान पावली, याची कुणालाच कल्पना आली नाही. कारण यावेळी राजापूरची गंगा जवळ जवळ वर्षभर प्रवाहीत राहिली होती.
साधारण गंगा आगमनाचा कालावधी हा सर्वसाधारणपणे उन्हाचा कडाका असताना फेब्रुवारी, मार्च महिन्यात असल्याचे मागील नोंदीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, यावेळी राजापूरची गंगा ऐन पावसाळ्यात म्हणजेच मंगळवार, दि. २२ जुलै रोजी प्रकट झाली आहे.