पुस्तक वाचनासोबत परिसरही वाचा : राजन गवस, कोल्हापुरात बाल स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 05:28 PM2017-12-19T17:28:32+5:302017-12-19T17:34:08+5:30
कोल्हापूर : पुस्तक वाचणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच आपल्या आजूबाजूचा परिसरही वाचा, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. येथील शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय बाल स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गवस यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
कोल्हापूर : पुस्तक वाचणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच आपल्या आजूबाजूचा परिसरही वाचा, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.
येथील शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय बाल स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गवस यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. सकाळच्या सत्रात ग्रंथदिंडी, साहित्यिकांचे माहिती प्रदर्शन, हस्ताक्षर प्रदर्शनाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुस्तकासोबत आजूबाजूचा परिसर जर आपल्याला वाचता आला, तर माणसाचे आयुष्य अधिक सुखकर होईल, असे गवस म्हणाले. रेकॉर्ड डान्ससारख्या विकृत स्नेहसंमेलनांतून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे. सर्व कलागुणांनी युक्त असे संमेलन करावे, ही कल्पना अफलातून आहे. या शाळेत झालेल्या या स्नेहसंमेलनाचा आदर्श इतरांनी घ्यावा. आजकाल मुले मोबाईल, टीव्ही आणि संगणक यांच्या अतिवापरामुळे मानसिकरीत्या अपंग बनली आहेत, असे गवस म्हणाले.
या बाल स्नेहसंमेलनाची सारी सूत्रे विद्यार्थ्यांनीच सांभाळली. स्वागताध्यक्ष घनश्याम शिंदे याने प्रास्ताविक केले. समर्थ याने पाहुण्यांची ओळख करून दिली, तर करिना धनवडे हिने सूत्रसंचालन केले. माधुरी सुतार हिने आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक पी. डी. काटकर, कलाशिक्षक मिलिंद यादव उपस्थित होते.
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी ग्रंथदिंडीत सहभागी
संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने झाले. यावेळी वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी सहभागी झाले होते. कवी बाळ पोतदार आणि अजित खराडे यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. टाळ व मृदंगाच्या तालावर विठ्ठल-रखुमाईचा गजर करीत विद्यार्थ्यांसह साहित्यप्रेमी या दिंडीत सहभागी झाले. एक्का गाडीतून शाळेच्या गणवेशातील विठ्ठल-रखुमाई सर्वांना शाळा शिकू द्या, असा संदेश देत होते. शिवाजी पेठ परिसरातून ही दिंडी निघाली.
कथाकथन, काव्यवाचनाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
कथाकथनाच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी कथा सादर केल्या. यावेळी साहित्यिक चंद्रकांत निकाडे, टी. आर. गुरव, बाळ पोतदार यांनीही कथा सादर केल्या, तर काव्यवाचनाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांना प्रतिसाद मिळाला. कवी बबलू वडार यांनी त्यांच्या कथा सादर केल्या.
‘वाचनकट्ट्या’वर १०० साहित्यिकांची पुस्तके
वाचनकट्ट्यावरील १०० साहित्यिकांच्या पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन ‘वाचनकट्टा’चे संकल्पक युवराज कदम यांच्या हस्ते झाले; तर शाळेतील दोन मोठ्या खोल्यांत दोन प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. एका खोलीत शंभर साहित्यिकांची चित्रांसह माहिती, तर दुसऱ्या खोलीत चिंचवाड हायस्कूल येथील शिक्षक आणि संग्राहक उत्तम तलवार यांच्या हस्ताक्षरांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याचे उद्घाटन चित्रकार तानाजी अस्वले यांच्या हस्ते झाले. ‘वाचनकट्ट्या’वर ऋग्वेद प्रकाशनाचे सुभाष विभुते, अक्षरदालन प्रकाशनाच्या वतीने संमेलनस्थळी बालसाहित्याच्या पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
आजचे कार्यक्रम
स. ९ वा. : पहिले सत्र - फन फेअर (सहभागी सर्व विद्यार्थी)
दु. १२ वा. : दुसरे सत्र - मुलांच्या भावविश्वाशी निगडित लघुपट (उद्घाटक : अजय कुरणे, दिग्दर्शक)
दु. ३ वा. : तिसरे सत्र - लोकनृत्य (सहभागी सर्व विद्यार्थी)