विभागीय क्रीडा संकुल लवकरच सुरू--चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:17 AM2017-11-12T01:17:33+5:302017-11-12T01:18:25+5:30
कोल्हापूर : शूटिंग रेंज व जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडा प्रकारांची क्रीडांगणे तयार असून, त्यांच्या वापरासाठी विविध क्रीडा संस्थांशी समन्वय साधून ती खेळाडूंना वापरण्यास द्यावीत.
कोल्हापूर : शूटिंग रेंज व जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडा प्रकारांची क्रीडांगणे तयार असून, त्यांच्या वापरासाठी विविध क्रीडा संस्थांशी समन्वय साधून ती खेळाडूंना वापरण्यास द्यावीत. त्यामुळे तेथे खेळाडूंचा वावर वाढून क्रीडांगणांचा वापर सुरू होईल. या निमित्ताने खेळाडूंसाठी विभागीय क्रीडा संकुलाच्या रूपाने अद्ययावत क्रीडा संकुल लवकरच सुरू होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्रात अधिक गुंतवणूक केल्यास अनेक गुणवंत खेळाडू उदयास येतील व ते राष्टÑीय, आंतरराष्टÑीय स्तरावर गौरवशाली कामगिरी करतील. कोल्हापूर येथे उभारण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंज व जलतरण तलाव वगळता सर्व क्रीडांगणांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यांचा वापर होणे आवश्यक असून, त्यासाठी क्रीडा संस्थांमार्फत या क्रीडांगणांचा वापर खेळाडूंसाठी व्हावा. जसजशी या ठिकाणी खेळाडूंची संख्या वाढेल, तसे काही त्रुटी समोर आल्यास त्या दूर करणे सोईचे होईल.
चंद्रकांत दळवी म्हणाले, १० मीटर शूटिंग रेंज लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. यासाठी शूटिंग साहित्य खरेदीबाबत नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीतील तेजस्वीन सावंत, राही सरनोबत, युवराज साळुंखे, अजित पाटील यांच्यामध्ये एकमत करून त्यानुसार साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार केला जाईल. साहित्य एकल पद्धतीने खरेदी होणार असल्याने तो प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल.
यासाठी पुढच्या आठ दिवसांत विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तज्ञ समितीची बैठक घेण्यात येईल.
दळवी यांनी मुख्य प्रवेशद्वार व स्वच्छता गृह, कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती, पहिल्या टप्प्यातील निविदेतील अपूर्ण कामे आदींचा सविस्तर आढावा घेऊन ही सर्व कामे १ डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बैठकीत डॉ. कुणाल खेमनार यांनी शिंगणापूर येथील राजर्षी शाहू क्रीडा प्रशालेसाठी आवश्यक असणाºया मल्टीपर्पज हॉलसाठी नावीन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, आदी उपस्थित होते.
पाण्याबाबत तज्ज्ञांचे मत घ्यावे
कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपेंट इनिशिएटिव्ह (केएसडीआय) या संस्थेने जलतरण तलावातील पाण्याचा निचरा करून तज्ज्ञांकडून मत घ्यावे व हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून सादर करावा. त्यावर शासकीय समितीने त्यांचा निर्णय घ्यावा व त्यानंतरच जलतरण तलावाचे पुढील काम करावे. खेळाडूंसाठी अडथळा ठरत असल्यास रनिंग ट्रॅकवर फिरण्यास बंदी घालावी. महानगरपालिकेने दुधाळी शूटिंग रेंजचा प्रस्ताव सादर करावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
२५ व ५० मीटर शूटिंग रेंजसाठी पायाभूत सुविधा तयार
विभागीय क्रीडा संकुलातील २५ व ५० मीटर शूटिंग रेंजच्याही सर्व पायाभूत सुविधा तयार असून, या रेंजचाही वापर होऊ शकतो. तशी मागणीही आहे. त्यामुळे या शूटिंग रेंजसाठीही साहित्य खरेदीचे प्रस्ताव मार्गी लावण्यात येतील, असे दळवी यांनी सांगितले.