कारखान्यांकडील साखर विक्रीवर निर्बंध फेबु्रवारीत १७%, मार्चमध्ये १४% साखर विकता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:56 AM2018-02-09T00:56:47+5:302018-02-09T00:57:14+5:30
कोल्हापूर : साखरेचे घसरते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलताना साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध आणले.
चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : साखरेचे घसरते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलताना साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध आणले. यानुसार कारखान्यांना फेबु्रवारीमध्ये त्यांच्याकडील कमाल १७ टक्के, तर मार्चमध्ये कमाल १४ टक्केच साखर विकता येणार आहे. यामुळे साखरेची बाजारातील आवक कमी होऊन तिचे दर वाढण्यास मदत होईल, अशी सरकार आणि साखर कारखानदारांचीही अपेक्षा आहे.
साखरेचे घाऊक बाजारातील दर २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. उसाची एफआरपी देणेही कारखानदारांना अडचणीचे झाले आहे. साखरेचे दर वाढावेत यासाठी सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी कारखानदारांची आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने साखरेवरील आयात कर दुप्पट केला आहे. राज्य सरकारचाही साखर कारखान्यांकडील २५ टक्के साखर विकत घेण्याचा विचार आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत साखरेचे दर ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. कारखान्यांवर विक्री मर्यादा घातल्यामुळे हे दर प्रतिक्विंटल तीन हजारांच्या पुढेच राहतील, असा साखर उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.
अशी ठरेल साठामर्यादा
सरकारच्या निर्णयानुसार १ जानेवारीला कारखान्याकडे असलेली शिल्लक साखर अधिक जानेवारी महिन्यात झालेले उत्पादन यातून जानेवारीत झालेली विक्री वजा जाता शिल्लक राहिलेल्या साखरेपैकी जास्तीत जास्त १७ टक्के साखर फेबु्रवारीत विकता येणार आहे. अशाच पद्धतीने मार्चमध्ये जास्तीत जास्त १४ टक्के साखर कारखान्यांना विकता येणार आहे. याचाच अर्थ फेबु्रवारीत ८३ टक्के आणि मार्चमध्ये ८६ टक्के साखर कारखान्यांना स्वत:कडे ठेवावी लागेल.
साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयामुळे बाजारातील साखरेचा ओघ कमी होऊन, दर वाढीस मदत होऊ शकेल आणि कारखान्यांना त्याचा फायदा होईल.
-विजय औताडे,
साखर उद्योगातील तज्ज्ञ.
गेल्या आठ ते दहा दिवसांत साखरेचे प्रति क्विंटल दर १५० ते २०० रुपयांनी वाढले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे ते आणखी वाढतील आणि ते साखर कारखानदारीसाठी फायदेशीर ठरेल.
-प्रफुल्ल विठ्ठलानी, अध्यक्ष, आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन.