श्रमदानातून रंकाळा परिसर ‘चकाचक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:50 AM2017-08-07T00:50:16+5:302017-08-07T00:50:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजने (एनएसएस)च्या ८०० स्वयंसेवकांनी रविवारी सकाळी तीन तास श्रमदान करून रंकाळा तलाव परिसर चकाचक केला. या स्वच्छता मोहिमेत रोटरी क्लब आॅफ करवीरचे सदस्य सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत सुमारे सात टन कचºयाचा उठाव झाला.
या स्वच्छता मोहिमेस सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी इराणी खण, मोहिते खण, रंकाळा पदपथ पतौडी उद्यान, संध्यामठाकडील उद्यान, रंकाळा तलावाच्या बाजूने जाणारा रस्ता या परिसराची स्वच्छता केली. घनकचरा, काचा व प्लास्टिकच्या बाटल्या विद्यार्थ्यांनी गोळा केल्या. तीन तासांच्या या मोहिमेत सात टन कचरा जमा करण्यात आला. यात प्लास्टिक कचºयाचे स्वतंत्र संकलन करण्यात आले. रोटरी क्लबने पुरविलेल्या पोत्यांमध्ये शंभर किलो प्लास्टिक कचरा संकलित करून स्वतंत्र वाहनातून तो पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला. या क्लबच्या वतीने पर्यावरण रक्षणाबरोबरच स्वच्छतेचा संदेश देणारे वाहन मोहिमेत सहभागी केले होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, ‘एनएसएस’चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, रोटरी क्लबचे एस. एन. पाटील, विशाळ जांबळे, प्रमोद चौगुले, ज्ञानदेव केसरकर, हरेश पटेल, कुशल पटेल, मनोज कोळेकर, शीतल दुग्गे, किरण खटावकर, काशीनाथ सांगावकर, विद्यापीठातील विविध विभाग, शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ‘एनएसएस’चे स्वयंसेवकांनी श्रमदान केले. मोहिमेसाठी महापालिकेतर्फे दोन डंपर, एक पाण्याचा टँकर, तर विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग व ‘रोटरी क्लब’ने झाडू, विळे, टोपल्या, पोती, हातमोजे, मास्क उपलब्ध करून दिले. दरम्यान, विद्यापीठाने नियमितपणे रंकाळा परिसरातील इराणी खण परिसरात स्वच्छता मोहिमा राबविल्या आहेत. दहा टन कचºयाचा उठाव यापूर्वी केला आहे.
स्वच्छतेशी रक्षाबंधनाचा संकल्प करावा
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाने रंकाळा परिसराची नियमित स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी विद्यापीठाकडून स्वच्छता मोहीम नियमितपणे राबविण्यात येईल. उद्याच्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनातच स्वच्छतेशी रक्षाबंधन करण्याचा संकल्प करावा. नागरिकांनी आपापल्या परिसरात जागरूकता दाखवून स्वच्छतेची सवय अंगी बाणवली, तर स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास वेळ लागणार नाही.
क्रांतिदिनी महास्वच्छता अभियान
क्रांतिदिनानिमित्त बुधवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत कोल्हापूर शहर परिसरातील विविध प्राचीन वास्तू, पुतळे, रस्ते व परिसरात विद्यापीठातर्फे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये विद्यापीठ परिसरासह बिंदू चौक, शिवाजी चौक, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, गंगावेस, रेल्वे स्टेशन, एस. टी. स्टँड, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका, खासबाग, गांधी मैदान आदी २८ ठिकाणच्या पुतळ्यांची स्वच्छता केली जाईल. यात शहरातील विविध महाविद्यालयांचे ‘एनएसएस’चे स्वयंसेवक सहभागी होणार असल्याचे ‘एनएसएस’चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.