संभाजी कांबळे यांची भरारी 'फिनिक्स' पक्ष्याप्रमाणे प्रेरणादायी : हिर्डेकर, कोल्हापुरात चिल्लर पार्टीतर्फे लघुपटाचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 06:31 PM2017-11-28T18:31:59+5:302017-11-28T18:42:17+5:30
पोलिस उपनिरिक्षक संभाजी कांबळे यांनी परिस्थितीशी संघर्ष करत मोठे यश मिळविले आहे. 'फिनिक्स' पक्ष्याप्रमाणे त्यांनी राखेतून उठून उंच घेतलेली भरारी कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, अशा शब्दात संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बी. एम. हिर्डेकर यांनी केले. 'परिस्थितीचा बाऊ करु नका, परिस्थितीवर मात करा ' असे आवाहन यावेळी झालेल्या व्याख्यानात संभाजी कांबळे यांनी केले.
कोल्हापूर : पोलिस उपनिरिक्षक संभाजी कांबळे यांनी परिस्थितीशी संघर्ष करत मोठे यश मिळविले आहे. 'फिनिक्स' पक्ष्याप्रमाणे त्यांनी राखेतून उठून उंच घेतलेली भरारी कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, अशा शब्दात संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बी. एम. हिर्डेकर यांनी केले. 'परिस्थितीचा बाऊ करु नका, परिस्थितीवर मात करा ' असे आवाहन यावेळी झालेल्या व्याख्यानात संभाजी कांबळे यांनी केले.
येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत गोविंद पानसरे यांच्या जयंती निमित्त आयोजित 'संघर्षाची यशोगाथा' या कार्यक्रमात हिर्डेकर अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी पोलिस उपनिरिक्षक संभाजी कांबळे यांचे आत्मचरित्रात्मक व्याख्यान झाले. अतीशय कष्टातून पोलिस उपनिरिक्षक झालेले संभाजी कांबळे यांच्या संघर्षाच्या यशोगाथेचा परीचय कोल्हापूरातील दोन अडीच हजार विद्यार्थ्यांनी घेतला. तत्पूर्वी कांबळे यांच्या जीवनावर आधारित 'फिनिक्स' या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची अफाट गर्दी होती.
पोलीस उपनिरीक्षक संभाजी कांबळे यांनी आपल्या भाषणात जी व्यक्ती परिस्थितीचा बाऊ करते, अशी व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करु शकत नाही, आपल्या यशाच्या आड जो कोणी येईल त्याचे हसत मुखाने स्वागत करा, त्यांच्या बोलण्याकडे सकारात्मक पहा, आपले काम निष्ठेने करा, यश निश्चितच तुमचे आहे.' असा संदेश दिला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.एम. हिर्डेकर यांच्या हस्ते संभाजी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चिल्लर पार्टीचे संस्थापक मिलींद यादव यांनी केले. यावेळी 'फिनिक्स' या लघुपटाचे दिग्दर्शक श्रीकांत पाटील यांनी लघुपटामागील संकल्पना सांगितली. पाहुण्यांची ओळख श्रीधर कुलकर्णी यांनी केली तर आर.टी. शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. मिलींद नाईक यांनी आभार मानले.
स्मशानभूमीतील पदार्थ खाउन मोठे यश
कोल्हापूरजवळील किणी-घुणकी येथील रहिवाशी असलेल्या संभाजी कांबळे यांनी अतिशय कष्टप्रद जगत जगत प्रसंगी स्मशानभूमीत ठेवलेले दिवसाचे पदार्थ खाउन पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत झेप घेतली. प्रामाणिक पोलीस अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या जीवनातील संघर्षाची कहाणी तरूणांपर्यंत पोहोचावी म्हणून चिल्लर पार्टीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.