कोल्हापूर रेल्वेस्थानकांवर पहा आता ‘ऐतिहासिक कोल्हापूर’चे दर्शन, मध्य रेल्वेचा उपक्रम; पर्यटकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 07:50 PM2018-08-22T19:50:36+5:302018-08-22T19:51:49+5:30
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनस्थळांची ओळख रेल्वे प्रवाशांना होऊन पर्यटनात वृद्धी व्हावी, या उद्देशाने मध्ये रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयामार्फत छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर ‘कलापूर एक्सप्रेस’ या उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत या स्थानकावरील भिंतींवर ऐतिहासिक कोल्हापुरातील पर्यटन स्थळे चित्ररूपात पाहण्यास मिळणार आहे.
ऐतिहासिक करवीरनगरीत येणाऱ्या पर्यटकांना येथील सांस्कृतिक व पर्यटनांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, वारसा दर्शविणाºया स्थळांची स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून चित्रे काढून घेतली जाणार आहेत. ती चित्रे स्थानकावरील विविध भिंतींवर, प्रतीक्षा कक्षात लावण्यात येणार आहेत.
यासाठी कोल्हापुरातील ३० चित्र कलाकारांशी रेल्वे प्रशासनाने संपर्क साधला आहे. त्यांच्यामार्फत तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणची चित्रे काढून घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून येथील ऐतिहासिक वारशांचा पुन्हा एकदा चित्ररूपात जतन केले जाणार आहे. पर्यटकांना कोल्हापूरची ओळख तर होईलच; पण स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी मोठा फायदाही होणार आहे.
शुक्रवारी या उपक्रमाची सुरुवात
कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावर उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता सबंधित कलाकारांना चित्रकलेचे साहित्य वितरण केले जाणार आहेत. ज्येष्ठ चित्रकार शामकांत जाधव, विलास बकरे, के. आर. कुंभार, डॉ. नलिनी भागवत या मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे.
ऐतिहासिक स्थळे....
अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, पन्हाळा, जोतिबा, विशाळगड, पंचगंगा नदीघाट, साठमारी, गंगावेश, दूधकट्टा, शाहू जन्मस्थळ, खासबाग, कुस्ती मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, नवीन राजवाडा, टेंबलाई मंदिर, कात्यायनी, रंकाळा, रामलिंग, बाहुबली, नृसिंहवाडी, खिद्रापूर, मसाई पठार, पांडव लेणी, इत्यादी पर्यटनस्थळांची यासाठी निवड केली आहे.
रेल्वे विभागाच्या स्वच्छ व सुंदर या उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाला या वास्तववादी चित्रांच्या माध्यमातून पुन्हा एकदा उजळा मिळणार आहे. स्थानिक कलाकारांना या माध्यमातून एक प्रकारे प्रेरणा ही मिळणार आहे.
- कृष्णात पाटील,
विभागीय रेल प्रबंधक (वाणिज्य) पुणे, मध्य रेल्वे