शिवसेना सत्तेसाठी लाचार : जोगेंद्र कवाडे यांची कोल्हापूरात टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:40 PM2019-02-22T16:40:41+5:302019-02-22T16:43:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चौकीदार चोर’ म्हणून हिणवणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वताच चोरांच्या टोळीत सहभागी झाले. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चौकीदार चोर’ म्हणून हिणवणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वताच चोरांच्या टोळीत सहभागी झाले. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी देशात निश्चित परिवर्तन करेल, यामध्ये आंबेडकरी जनतेचा मोठा सहभाग असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रा. कवाडे पक्षाच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रा. कवाडे म्हणाले, सरकारमध्ये रहायचे आणि सरकारलाच शिव्या घालण्याचा उद्योग शिवसेनेने केला. काल-परवा पर्यंत स्वबळाचा नारा देत मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहे, म्हणणारे ठाकरे चोरांच्या टोळीत सामील झाले कसे? याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे लागेल.
समाजातील प्रत्येक घटक सरकारच्या कारभाराने त्रस्त आहे. यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर होते, तेथून १२ किलो मीटर शहीद जवानाचे कुटूंब रहात होते. तिथे जाऊन कुटूंबाचे सात्वन करावे, असे त्यांना वाटले नाही. यावरून भाजप सरकार संवेदीनहीन आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत केंद्र सरकारच्या आडून देशात आपला अजेंडा राबवत आहेत. देशाची वाटचाल अराजकतकडे सुरू असून कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी परिवर्तन करून देश वाचवेल, असेही त्यांनी सांगितले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर, नंदकुमार गोंधळी आदी उपस्थित होते.