सेवेत कायम करा, १८ हजार वेतन द्या, आशा वर्कर्स युनियन : जिल्हा परिषदेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:19 AM2018-07-03T01:19:34+5:302018-07-03T01:19:57+5:30
शासकीय सेवेत कायम करून किमान १८ हजार रुपये वेतन मिळावे, यांसह अन्य मागण्यांसाठी सिटू संलग्न कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने सोमवारी दुपारी जिल्हा
कोल्हापूर : शासकीय सेवेत कायम करून किमान १८ हजार रुपये वेतन मिळावे, यांसह अन्य मागण्यांसाठी सिटू संलग्न कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आशा कर्मचाऱ्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला.
रेल्वे स्टेशन परिसरातून आशा वर्कर्स युनियनच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, उपाध्यक्षा संगीता पाटील, उज्ज्वला पाटील, माया पाटील व मंदाकिनी कोडक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली़ विविध मागण्यांसह शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकी, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर आला. गुलाबी रंगाच्या साड्या परिधान केलेल्या या आशा कर्मचाºयांच्या मोर्चाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्हा परिषदेसमोर आल्यानंतर या कर्मचाºयांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. अखेर शिक्षण सभापती अंबरीश घाटगे आणि समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांनी मोर्चासमोर येत या सर्वांच्या मागण्या ऐकून घेतल्या. याबाबत पाठपुरावा करण्याचे मोर्चेकºयांना आश्वासन दिले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एन.आर.एच.एम.) अंतर्गत शहर व गावपातळीवर शासनाची आरोग्य सुविधा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यात आशा व गटप्रवर्तक यांचे मोठे योगदान आहे़ शासकीय रुग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, नवजात बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे़ मात्र, या कामाचा मोबदलाही चार ते सहा महिन्यांनी दिला जातो़ गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला़
मोर्चेकºयांच्या प्रतिनिधींनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोरे यांच्याशी चर्चा केली. संघटनेचे प्रा. सुभाष जाधव, प्रा. सुभाष मगदूम, शिवाजी मगदूम, आण्णासाहेब चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला़