शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
By admin | Published: October 22, 2015 01:15 AM2015-10-22T01:15:45+5:302015-10-22T01:16:04+5:30
वीरधवल, राहीसह कोल्हापूरचे सहा खेळाडू, दोन संघटकांचा समावेश
मुंबई : राज्य सरकारतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. यात आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे आणि आॅलिम्पियन
नेमबाज राही सरनोबत यांच्यासह कोल्हापूरच्या सहा खेळाडूंचा आणि दोन संघटकांचा समावेश आहे.
आज जाहीर झालेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमध्ये वीरधवल खाडे (जलतरण), राही सरनोबत (नेमबाज), रणजित नलवडे (कुस्ती), उज्ज्वला जाधव (हॅण्डबॉल) या खेळाडूंना २०१२-१३ सालासाठी तर चंद्रकांत माळी (वेटलिफ्टींग), आणि विशाल माने (कुस्ती) या दोघांना २०१३-१४ सालासाठी पुरस्कार देण्यात आले आहेत. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये संघटक / कार्यकर्ते या विभागांमध्ये २०१२-१३ साठी कोल्हापूरच्या राजाराम शेटगे यांना तर २०१३-१४ साठी निवृत्ती
भेरट यांची निवड करण्यात आली आहे.
२०१२-१३ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी पुण्याचे रमेश विपट यांची, तर २०१३-१४ च्या राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी लातूरचे गणपतराव माने यांची निवड करण्यात आली आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीत
प्रवीण ठिपसे, तेजस्वीनी सावंत, अंजली भागवत, काका पवार, वीरधवल खाडे, प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा आयुक्त, क्रीडा, युवक सेवा संचलनालय सचिव यांचा समावेश होता.