शिवाजी सावंत यांची कर्णकथा पन्नाशीत
By admin | Published: September 12, 2016 12:51 AM2016-09-12T00:51:30+5:302016-09-12T00:51:30+5:30
कोल्हापुरातील पोलिस क्वार्टर्समध्ये झाला ‘मृत्युंजय’चा जन्म
समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर
ज्या वयात रंगीबेरंगी स्वप्नं पाहायची, त्या वयात तेविशीतील एक युवक चिंतन करीत होता. महाभारतातील कर्ण त्याच्या मनात घट्ट रुतला होता. सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाचं दु:ख त्याच्या उरात दाटलं होतं. त्या तरुणानं निर्धार केला कर्णाला न्याय देण्याचा. प्रत्यक्षात कुरुक्षेत्रावर तीन महिने राहून, अखंड वाचनानंतर केलेल्या चिंतनातून कोल्हापुरातील दसरा चौकातील पोलिस क्वार्टर्सच्या एका खोलीत बसून त्यानं ही कर्णकथा लिहिली. ती वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली आणि शिवाजी सावंत या २७ वर्षांच्या युवकाला ‘मराठा’च्या अग्रलेखातून प्र. के. अत्रे यांनी ‘मृत्युंजयकार’ ही पदवी बहाल केली.
‘मृत्युंजय’ कादंबरीचे बुधवारी (दि. ७) सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले शिवाजी सावंत शाळकरी वयात नाटकात कृष्णाची भूमिका करतात; पण त्यांना भावतो तो कर्ण.
पुढे कोल्हापुरात आल्यानंतर मेन राजाराम हायस्कूलमध्ये शॉर्टहँडचे शिक्षक म्हणून काम करताना त्यांना करवीर वाचन मंदिराचा लळा लागला. महाभारतावरील विविध गं्रथ वाचताना कर्ण त्यांना अधिकच खुणावू लागला. मग त्यांनी त्या दृष्टीने वाचन सुरूच ठेवले. आता त्यांनी थेट कुरुक्षेत्रावर जाण्याचा निर्णय घेतला. पैशांचा प्रश्न होता. पहिला धनादेश भालजी पेंढारकर यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अगदी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंत अनेकांनी याकामी मदत केली.
कुरुक्षेत्राचा दौरा करून आलेल्या शिवाजीरावांनी त्यांचे मोठे भाऊ, जे पोलिस दलात कार्यरत होते, त्यांच्या दसरा चौकातील पोलिस क्वार्टर्समध्ये मुक्काम ठोकला. आतापर्यंत मनात कर्णाबद्दल जे काही साठलं होतं, ते झपाटल्यागत झरझर उतरायला सुरुवात केली. दीड हजार पानांचं हे बाड तयार झालं. कोल्हापुरात कुणी त्याला हात लावायला तयार झालं नाही. शिवाजीरावांचे मित्र आर. के. कुलकर्णी हे हस्तलिखित आणि शिवाजीरावांना घेऊन ग. दि. माडगूळकरांना भेटले. माडगूळकरांनी कॉन्टिनेन्टलच्या अनंतराव कुलकर्णी यांना चिठ्ठी दिली आणि ‘मृत्युंजय’चा जन्म झाला. ७ सप्टेंबर १९६७ रोजी पहिल्या प्रतीचे पूजन झाले.
या पोलिस क्वार्टर्समधील १२ क्रमांकाच्या खोलीत ‘मृत्युंजय’चा जन्म झाला. आज तिथे कुणी राहत नाहीत. तिथे राहणारे पोलिस हवालदार निवृत्त झाले. ज्या खोलीत मराठी साहित्यविश्वातील इतिहास घडला, तिथे आता ‘निर्धार’ या संस्थेच्या वतीने लावण्यात आलेली शिवाजीरावांची फक्त प्रतिमा आहे. ३० आवृत्त्या, सहा भाषांमध्ये भाषांतर, इंग्रजीत अनुवादाच्या साहित्यातील ‘नोबेल’साठी नामांकन आणि लाखो वाचकांचे प्रेम मिळविणारी ही कादंबरी आता पन्नाशीची झाली आहे. कोठे, काय पहाल?
‘मृत्युंजय’ला ४९ वर्षे पूर्ण झाली. या प्रवासात अनेक माणसं अशी भेटली की, त्यांनी सांगितलं की, मी ‘मृत्युंजय’मुळे उभा राहिलो. आत्महत्येचे विचारही मनात आलेला एखादा सांगतो की, ‘मृत्युंजय’मुळे माझा विचार बदलला. ‘मृत्युंजय’च्या इंग्रजी भाषांतराचे साहित्यातील नोबेलसाठी कोलक ात्याहून नामांकन झाले होते. एखाद्या कादंबरीमुळे माणूस आयुष्यात पुन्हा उभं राहणं हे ‘नोबेल’च आहे, असं मी त्यांना म्हणायचे. नव्या पिढीतील मुलं-मुली जेव्हा ‘मृत्युंजय’बद्दल सांगतात, तेव्हा समाधान वाटतं.
- मृणालिनी शिवाजीराव सावंत