VIDEO - शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी विकास आघाडीची आघाडी, पहिला निकाल विद्यापीठ शिक्षक गटाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:14 PM2017-11-20T12:14:49+5:302017-11-20T16:00:22+5:30
शिवाजी विद्यापीठ अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांवर शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने सर्वप्रथम जाहीर झालेल्या निकालात आघाडी घेतली असून विद्यापीठ शिक्षक गटातील दोन जागा जिंकल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांवर शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने सर्वप्रथम जाहीर झालेल्या निकालात आघाडी घेतली असून विद्यापीठ शिक्षक गटातील दोन जागा जिंकल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विद्यापीठ शिक्षक गटातून विद्यापीठ विकास आघाडीचे सागर डेळेकर, भारती पाटील आणि एन. बी. गायकवाड हे विजयी झाले. शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ विकास मंच यांच्यात मैत्रीपूर्ण लढती झाल्या.
शिक्षक गटातील मतमोजणीनंतर व्यवस्थापन गटातील मतमोजणी सुरु झाली. विविध अभ्यासमंडळांपैकी गणित (मॅथेमॅटिक्स) अभ्यासमंडळाच्या गटात शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे दिलिप हसबे, नवनीत सांगले हे विजयी झाले. या गटात विद्यापीठ विकास संघाचे (सुटा) हंबीरराव दिंडे विजयी झाले.
सुटाचे जनार्दन यादव आणि विकास आघाडीचे दिलीप हसबे यांना समान मते पडल्याने चिठ्ठीवर निकाल जाहीर करण्यात आला. हसबे यांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले.
व्यवस्थापन गटातून शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे दत्तात्रय चवरे, सारंग बोला हे विजयी झाले, तर सुटाचे रविंद्र तेली विजयी झाले.
या निवडणुकीच्या रिंगणात शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, विद्यापीठ विकास मंच, आजी-माजी विद्यार्थी कृती समिती आणि विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) आपली ताकद पणाला लावली.
शुक्रवारी (दि. १७) मोठ्या चुरशीने सरासरी ६२ टक्के मतदान झाले. गेल्या दीड महिन्यांपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील वातावरण हे निवडणूकमय झाले होते.
नोंदणीकृत पदवीधर, प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी आपआपल्या आघाडी अथवा युतीची अधिसभा, अन्य अधिकार मंडळांवर सत्ता आणण्यासाठी पायाला भिंगरी बांधली. या मतमोजणी प्रक्रियेत स्वत: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर सहभागी झाले आहेत.
आपल्या उमेदवारांना किती मते मिळतील, आपले आणि विरोधकांचे बलाबल हे गटनिहाय कसे राहिले याची आकडेवारी, अंदाज व्यक्त करण्यात निवडणूक लढविलेल्या आघाडी आणि युतीतील संघटनांचे पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्ते व्यस्त आहेत.
शिवाजी विद्यापीठातील परिक्षा भवन क्रमांक दोनमध्ये मतमोजणीसाठी २५ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. पंधरा टेबलांवर मतमोजणी सुरु आहे. गटनिहाय मतपेट्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. सकाळी विद्यापीठ शिक्षक गटातील मतमोजणीने सुरुवात झाली.
पहिला निकाल विद्यापीठ शिक्षक गटाचा जाहीर
मतमोजणीची सुरुवात विद्यापीठ शिक्षक गटाने होणार झाली असून या गटाचा निकाल सकाळी अकराच्या सुमारास लागण्यास सुरुवात झाली. या गटात जाहीर झालेले दोन जागांचे निकाल लागले असून या दोन्ही जागा विद्यापीठ विकास आघाडीने जिंकल्या आहेत. यापाठोपाठ अभ्यास मंडळांची मतमोजणी सुरु झाली.
अधिसभा प्राचार्य, अधिसभा शिक्षक, विद्या परिषद शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर गट घेतले जातील. पसंतीक्रमानुसार मतदान झाले असल्याने मतमोजणीला जादा वेळ लागणार आहे. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालणार असल्याची शक्यता आहे.