बदलांसह शिवाजी विद्यापीठ ‘नॅक’ला सामोरे जाणार-- थेट संवाद

By admin | Published: September 17, 2014 11:26 PM2014-09-17T23:26:37+5:302014-09-17T23:47:56+5:30

चांगले मानांकन मिळेल : व्ही. बी. जुगळे-

Shivaji University will face the 'Knack' with the changes - Direct Dialogue | बदलांसह शिवाजी विद्यापीठ ‘नॅक’ला सामोरे जाणार-- थेट संवाद

बदलांसह शिवाजी विद्यापीठ ‘नॅक’ला सामोरे जाणार-- थेट संवाद

Next

प्रश्न : ‘नॅक’ची तयारी कधीपासून सुरू झाली ?
उत्तर : या मूल्यांकनाची तीन फेऱ्यांची साखळी असते. त्यातील दुसरी फेरी २००३-२००९ मध्ये विद्यापीठाने पूर्ण केली. ‘नॅक’ समिती भेट देऊन गेल्यानंतर फेब्रुवारी २००९ पासून मूल्यांकनाच्या तिसऱ्या फेरीची तयारी विद्यापीठाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या माध्यमातून सुरू केली. दुसऱ्या फेरीत समितीने शिफारशी, सूचना केल्या होत्या. त्यांची पूर्तता तसेच अभ्यासक्रम-पाठ्यक्रमातील बदल, शिक्षण पद्धती, संशोधन आणि सल्ला, प्रशासन, विद्यार्थ्यांचा विकास, चांगले उपक्रम राबविणे, नावीन्य या निकषांच्या आधारे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू झाली.
प्रश्न : शिक्षणपद्धती, विद्यार्थी विकासाबाबत काय केले आहे?
उत्तर : पारंपरिक अभ्यासक्रमांची पुनर्ररचना केली आहे. त्यात १५०० अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. त्यात मूडल्स, स्मार्ट क्लासरूम, विविध सॉफ्टवेअरचा समावेश केला आहे. त्यासह उपयोजित शास्त्राचा वापर केला असून, विद्यार्थ्यांना कार्यानुभवाच्या तत्त्वावर शिक्षण देणारी पद्धत रुजविली आहे. यशवंतराव चव्हाण रूरल डेव्हलपमेंट, मराठा इतिहास संशोधन केंद्र तसेच कौशल्यावर आधारित आणि सेल्फ स्पोर्टिंग अभ्यासक्रम सुरू केले आहे. बदलत्या तंत्रज्ञानासह अभ्यासक्रमांच्या पुनर्ररचनेबाबत प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले आहे. विद्यार्थी विकासाचे उपक्रम राबविले आहेत.
प्लेसमेंट सेलतर्फे गेल्या पाच वर्षांत १५१५ विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. विभागनिहायदेखील रोजगार मेळावे घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी यूथ डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे.
प्रश्न : संशोधनाबाबत विद्यापीठाची स्थिती कशी आहे?
उत्तर : ‘नॅक’च्या मूल्यांकनात संशोधन हा महत्त्वाचा निकष आहे. त्यात विद्यापीठात सध्या सुरू असलेले आणि पूर्ण झालेल्या संशोधन प्रकल्पांना २५ कोटींचे अनुदान मिळाले आहे. त्यासह युजीसी, डीबीटी, डीएसटी या केंद्रीय पातळीवरील संस्थांकडून तसेच ‘डीएसटी-पर्स’, ‘आयपीएलएस’, ‘डीएसटी-फिस्ट’, सॅप आणि जागतिक बँकेकडून एकूण ९४ कोटी ३० लाखांचा निधी गेल्या पाच वर्षांत विद्यापीठाला संशोधन कार्यासाठी मिळाला आहे. तसेच लिड बॉटनिकल गार्डनसाठी ९९ लाख आणि संशोधनासाठी लागणाऱ्या अद्ययावत यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी पाच कोटी मिळाले आहेत.
संशोधनामध्ये देशात विद्यापीठाचा १३ वा, अशिया खंडात २५ वा आणि जगात ११३ वा क्रमांक आहे. ते ‘करंट सायन्स्’ या संशोधन क्षेत्रातील मासिकाने जून २०१३ च्या अंकात प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठाचे संशोधनावर आधारित शिक्षक व संशोधक विद्यार्थ्यांची १८२ पुस्तके, ६३ खंड आणि ३ हजार ७०८ लेख प्रसिद्ध झाले आहेत.
प्रश्न : प्रशासकीय पातळीवर काय केले आहे?
उत्तर : निकाल वेळेत लावण्यात विद्यापीठ राज्यात आघाडीवर आहे. त्याबाबत राज्यपालांनी पत्र पाठवून विद्यापीठाचे विशेष अभिनंदन केले आहे. विविध अधिकार मंडळांच्या माध्यमातून विद्यापीठाचे ‘व्हिजन २०२५’ तयार केले आहे. त्यात शैक्षणिक, संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीचे नियोजन केले आहे. विद्यापीठाच्या कॅम्पस्ला जैवविविधता परिसर म्हणून मान्यता मिळाली आहे. पाण्याबाबत विद्यापीठ स्वयंपूर्ण झाले आहे. ‘ई गर्व्हन्स’चा वापर केला आहे.
प्रश्न : नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत का?
उत्तर : मटेरियल सायन्स्, भौतिकशास्त्र आणि ग्रीन केमिस्ट्री या क्षेत्रातील संशोधन हे विद्यापीठाचे नावीन्य आहे. शिवाय दलित साहित्य, साखर कारखानदारी विषयांवर काम सुरू आहे.
पुढील टप्प्यात पाणी व्यवस्थापनाबाबत विद्यापीठ काम करणार आहे. जैवतंत्रज्ञान विभाग देशात दहाव्या क्रमांकावर आहे. महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून निर्भया अभियान राबविले आहे. ‘कमवा आणि शिका’ योजना, अग्रणी महाविद्यालय (लीड कॉलेज) संकल्पनेचे महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठांनी अनुकरण केले आहे. जगातील २५ देशांमधील विद्यापीठांबरोबर संयुक्त संशोधन प्रकल्प सुरू आहेत.
त्याअंतर्गत ३१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. चिकोत्रा खोरे समन्यायिक पाणीवाटप प्रकल्पात ‘विद्यापीठ नॉलेज पार्टनर’ म्हणून काम करीत आहे. आंतरशाखीय शिक्षणपद्धतीअंतर्गत ‘चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम’ची अंमलबजावणी केली आहे.
प्रश्न : तिसऱ्या फेरीतील मूल्यांकनाबाबत काय अपेक्षा आहे?
उत्तर : मूल्यांकनाच्या दुसऱ्या फेरीत ‘नॅक’ समितीने केलेल्या सूचना, शिफारशीप्रमाणे बदल स्वीकारून विद्यापीठाने तिसऱ्या फेरीत ‘अ’ मूल्यांकन मिळविण्याच्या निर्धाराने तयारी केली आहे. त्यात विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी या विद्यापीठाच्या घटकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
दुसऱ्या फेरीत विद्यापीठाला ‘ब’ मानांकन मिळाले होते. सकारात्मक, विकासाच्यादृष्टीने केलेल्या बदलांसह विद्यापीठ ‘नॅक’ मूल्यांकनाला सामोरे जाणार आहे. आता तिसऱ्या फेरीसाठी विद्यापीठाची झालेली तयारी, स्वीकारलेले बदल पाहता चांगले मूल्यांकन मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. संतोष मिठारी

चांगले मानांकन मिळेल : व्ही. बी. जुगळे
शैक्षणिक, संशोधन, आदी पातळींवर विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना त्यांची वेगळी ओळख निर्माण करून देणे, त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील अस्तित्व आणि स्थान दाखवून देण्याचे काम नॅशनल अ‍ॅक्रिडेशन अँड असेसमेंट कौन्सिल (नॅक) मूल्यांकनाद्वारे करते. शिवाजी विद्यापीठाचे मूल्यांकन मंगळवार (दि.२३) ते शनिवार (दि. २७) या कालावधीत ‘नॅक’ समिती करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने केलेली तयारी, स्वीकारलेले बदल याबाबत विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. व्ही. बी. जुगळे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

Web Title: Shivaji University will face the 'Knack' with the changes - Direct Dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.