शिवाजी विद्यापीठाची विश्वासार्हता वाढली, विश्वासाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाच्या निकालाचे आव्हान समर्थपणे पेलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:33 AM2017-10-25T05:33:33+5:302017-10-25T05:34:25+5:30
कोल्हापूर : संवाद आणि विश्वासाच्या जोरावर मुंबई विद्यापीठातील निकालाचे आव्हान समर्थपणे पेलले. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील अनुभव खूप उपयोगी पडला.
कोल्हापूर : संवाद आणि विश्वासाच्या जोरावर मुंबई विद्यापीठातील निकालाचे आव्हान समर्थपणे पेलले. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील अनुभव खूप उपयोगी पडला. मुंबईतील या कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाची विश्वासार्हता वाढली असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे सांगितले. ‘लोकमत’ शहर कार्यालयाला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठातील कामगिरी, निकालाची स्थिती, त्याठिकाणी राबविलेली यंत्रणा आदींबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्याचे काम आव्हानात्मक होते. ज्यावेळी मी तेथील प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी ३०० परीक्षांमधील ५५ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर अवघ्या वीस दिवसांत चार लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले. यासाठी त्याठिकाणी कार्यरत असलेल्या यंत्रणा वापरली.
लवकर निकाल लावण्यासाठी तेथील अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद, विश्वास या सूत्रावर जोर देत कार्यरत राहिलो. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. पुणे विद्यापीठापाठोपाठ मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाल्याने यातून शिवाजी विद्यापीठाचा सन्मान झाला आहे. निकालाच्या मुद्द्यावरून अडचणीत आलेल्या मुंबई विद्यापीठाला सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासणीसाठी आपल्या विद्यापीठाने मदतीचा हात दिला.
त्यानंतर प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केलेल्या सकारात्मक कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय, राज्य पातळीवर विश्वासार्हता वाढली आहे.
मुंबई विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनाचा निकालाचा वेग दिवाळीमुळे मंदावला होता. सुमारे २४ हजार इतके पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करावयाचे आहेत.
त्यातील आतापर्यंत साधारणत: १२ हजार निकाल जाहीर झाले आहेत. उर्वरित निकालांचे काम या महिनाअखेरपर्यंत संपविण्यात
येईल.
>ग्रामीण विद्यापीठांचा विचार व्हावा
देशातील ग्रामीण भागातील विद्यापीठांचे संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अनुषंगाने काही चांगले काम सुरू आहे. देशातील वीस विद्यापीठे जागतिक दर्जाची बनविणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्यामध्ये ग्रामीण विद्यापीठांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, सध्या देशात राज्यनिहाय, विविध अभ्यासक्रमनिहाय शिक्षणाबाबतचे धोरण आहे. ते बदलून समान धोरण असणे आवश्यक आहे.
बांधिलकी मोठी
औरंगाबाद, पुणे, मुंबईच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाबाबतची समाजातील विविध घटकांची मोठी बांधीलकी आहे. त्याची जाणीव मला येथून बाहेर काम करताना झाली असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, ही बांधिलकी विद्यापीठाला मोठे बळ देणारी आहे. त्याच्या जोरावर विद्यापीठाचा विविध क्षेत्रांतील नावलौकिक वाढत आहे.