शिवभक्त कोल्हापुरातून दिल्लीकडे रवाना दिल्लीत शिवजयंती सोहळा :स्थानकावर घुमला ‘जय भवानी-जय शिवाजी’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:39 AM2018-02-14T01:39:27+5:302018-02-14T01:41:00+5:30
कोल्हापूर : दिल्ली येथे १९ फेब्रुवारीला होणाºया शिवजयंती सोहळ्यास कोल्हापुरातून मंगळवारी सकाळी पहिली शिवभक्तांची तुकडी निजामुद्दीन एक्स्प्रेस’ या रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाली.
कोल्हापूर : दिल्ली येथे १९ फेब्रुवारीला होणाºया शिवजयंती सोहळ्यास कोल्हापुरातून मंगळवारी सकाळी पहिली शिवभक्तांची तुकडी निजामुद्दीन एक्स्प्रेस’ या रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जयघोषांनी कोल्हापुरातील छत्रपती शाहू रेल्वेस्थानकावर वातावरण शिवमय झाले होते. या शिवभक्तांसाठी रेल्वेतील स्वतंत्र डब्याचे नियोजन केले होते.
दिल्ली येथे सोमवारी (दि. १९) शिवजयंती सोहळ्यास महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या पाच राज्यांतील शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. राज्याभिषेक हा लोकोत्सव करण्यात यश मिळविल्यानंतर आता शिवजयंती ही ‘राष्ट्रोत्सव’ व्हावा, या भूमिकेतून खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने हा शिवजयंती उत्सव दिल्लीतील राजपथशेजारी इंदिरा गांधी राष्टÑीय कला केंद्राच्या मैदानावर साजरा करण्यात येत आहे. यासाठी खासदार संभाजीराजे दिल्लीत थांबून नियोजनात व्यस्त आहेत. मंगळवारी सकाळीच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य दिल्लीत पोहोचले आहेत. सोमवारी हजारो कलाकारांसह हत्ती आणि घोड्यांचा समावेश असलेली शिवछत्रपतींची मिरवणूक लक्षवेधी ठरणार आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी ९ वाजता शिवभक्तांची पहिली तुकडी दिल्लीकडे रेल्वेने रवाना झाली. हे शिवभक्त आज, बुधवारी सायंकाळी पोहोचणार आहेत.
मिरजेतून आज शिवभक्त जाणार
बुधवारी रात्री मिरज रेल्वे स्थानकातून गोवा एक्स्प्रेसने शिवभक्त रवाना होत आहेत. शिवाय शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता मिरज रेल्वे स्थानकातून सुमारे ५०० हून अधिक शिवभक्त दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
शोभायात्रेत लवाजमा : दिल्लीमध्ये सोमवारी काढण्यात येणाºया शोभायात्रेत पुण्याचे ३०० कलाकारांचे स्वराज्य ढोलपथक, ६० कलाकारांचे ध्वजपथक, १२ कलाकारांचे तुतारी पथक, २०० जणांची वारकरी दिंडी, ७० कलाकारांचे लेझीम पथक, १२ जणांचे हलगी पथक, २० जणांचे शाहिरी पथक, ८० कलाकारांचे मर्दानी खेळ, २५ जणांचे मल्लखांब पथक, ५० जणांचे धनगरी ढोलपथक तसेच पूर्वोत्तर राज्यांतील लोककलाकार त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. शाहीर आझाद नायकवडी प्रथमच शिवाजी महाराजांचा हिंदीतून पोवाडा यावेळी सादर करणार आहेत.