कोल्हापूर विकास प्राधिकरण सचिवपदी शिवराज पाटील : चंद्रकांत पाटील यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:55 AM2018-02-06T11:55:00+5:302018-02-06T11:59:08+5:30
कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती आज करण्यात आली. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रत्यक्ष आपल्या कामकाजात सुरवात करतील. कोल्हापूरच्या विकासाची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कोल्हापूर : कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती आज करण्यात आली. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रत्यक्ष आपल्या कामकाजात सुरवात करतील. कोल्हापूरच्या विकासाची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्य़ाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आली. पुणे, मुंबई येथे ज्या पद्धतीने विकास प्राधिकरणाने शहरांचा विकास साधला त्याच पद्धतीने किंबहुना त्याहून अधिक चांगल्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हे प्राधिकरण काम करणार आहे.
हे प्राधिकरण प्रशासकीय इमारतीतून बसून आपले कामकाज पाहणार असून आता प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होणार आहे. कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी लातूरचे प्रसिद्ध नगररचनाकार शिवराज पाटील यांची नेमणूक करण्यात आली. आज त्यांच्या नेमणुकीचा आदेशही काढण्यात आला.
८ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील आणि कामकाजास सुरुवात करतील. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन झाली असून जिल्ह्याच्या विकासाची खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून सुरुवात होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.