सप्तसुरांमध्ये रंगली ‘मैफल रंगबहारची’

By admin | Published: January 23, 2017 12:05 AM2017-01-23T00:05:10+5:302017-01-23T00:05:10+5:30

नवोदितांसह ज्येष्ठांचीही गर्दी : आबालाल रेहमान, बाबूराव पेंटर, विश्वनाथ नागेशकर स्मृती सोहळ्यानिमित्त आयोजन

Sightseeing | सप्तसुरांमध्ये रंगली ‘मैफल रंगबहारची’

सप्तसुरांमध्ये रंगली ‘मैफल रंगबहारची’

Next



कोल्हापूर : गुलाबी थंडी, उगवत्या किरणांच्या साक्षीने कर्णमधुर स्वर, ब्रश, कुंचल्यांचा भिरभिरता कलाविष्कार अशा प्रसन्न वातावरणात रविवारी ‘रंगबहार’ची मैफल सप्तसुरांत न्हाऊन निघाली. नवोदितांसह दिग्गज कलाकारांनी विविध कलाकृतींचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर स्मृती सोहळ्यानिमित्त टाऊन हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
त्यामध्ये बहुतांश चित्रकारांनी युवक, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांची चित्रशिल्पे तयार केली. त्यामध्ये गौरी शेळके हिने कंपोझ प्रकारात महादेवाची पिंडी, विपुल हळदणकरने इलस्ट्रेशन विषयावर ‘कामसूत्र’वर आधारित कलाकृती रेखाटल्या. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नवोदित कलाकारांसह ज्येष्ठांनीही गर्दी केली होती; तर ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांची नात व उपजत चित्रकला अंगी भिनलेल्या डॉ. सायली घाटगे (पुणे) हिने मॉडर्न आर्ट प्रकारातील तैलरंगातील व्यक्तिचित्र साकारले. सुमेध सावंत यांनी ‘लहान मुलांचा चित्रकलेकडील ओढा’ ही संकल्पना मांडणशिल्पाच्या रूपाने मांडली.
पवन कुंभार, जयदीप साळवी, घनशाम चावरे, अनुप संकपाळ यांच्या शिल्पांनी उपस्थितांना आश्चर्यचकित केले, तर महेश बाणदार याने कोलाज प्रकारातील चित्र साकारले. सिद्धार्थ गावडे, प्रियंका चिवटे, फिरोज शेख, हृषिकेश मोरे, संदीप घुले, विशाल भालकर यांनी अनुक्रमे हँडमेड, कॅनव्हास, कार्डशीट, आदी प्रकारांतील व्यक्तिचित्रांचा आविष्कार सादर केला. व्यक्तिचित्रांच्या साथीला ‘रंगावली’कार अशांत मोरे,
संदीप कुंभार यांच्या
कलाकृतींनीही उपस्थितांचेही लक्ष वेधले.
या मैफिलीसाठी मुंबई, पुणे, सांगली, सातारा, बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणाहून कलाप्रेमींनी गर्दी केली होती.
बालचमूंची उपस्थितीही लक्षणीय
एकीकडे नामवंत, नवोदित कलाकारांकडून कलेची मुक्त उधळण, तर दुसरीकडे छंद म्हणून नुकताच हातात घेतलेला ब्रश, त्यातून मनात येईल ती कलाकृती कागदावर रेखाटणारे बालकलाकार असे चित्र पाहावयास मिळाले. सकाळपासूनच बालकलाकारांनी पालकांसमवेत हजेरी लावली होती. आपल्या मनात असलेल्या प्रतिमांना रंगांच्या साहाय्याने वास्तवात उतरविण्यात ते दंग होते. त्यात काहीजण निसर्गचित्रे, तर काही पुस्तकातील चित्रे जशीच्या तशी काढण्याचा प्रयत्न करीत होते. यातच साताऱ्याहून आलेल्या अकरा वर्षांच्या मंदार लोहारने छोटी गणेशमूर्ती साकारली. ती उत्सुकतेने पाहण्यासाठी आबालवृद्धांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती.

Web Title: Sightseeing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.