‘सरां’ची कर्जमर्यादा १८ लाख
By admin | Published: September 14, 2015 12:16 AM2015-09-14T00:16:34+5:302015-09-14T00:18:40+5:30
‘कोजिमाशि’च्या सभेत मंजुरी : शेअर्स मर्यादा, कर्जमुक्ती, व्याजदरावर जोरदार चर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या (कोजिमाशि) सभेत सभासदांना १८ लाख कर्ज देण्याच्या पोटनियम दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. शेअर्स मर्यादा वाढवा, कर्जमुक्तीचे पैसे परत करा, कर्जाचा व्याजदर कमी करा, आदी विषयांवर यावेळी जोरदार चर्चा झाली. ‘कोजिमाशि’ ची ४५वी वार्षिक सभा रविवारी शाहू सांस्कृतिक मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष बाळ डेळेकर होते.
पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत प्रश्न विचारण्यावरून गोंधळ न करता शिस्तीने प्रश्न विचारण्याचे आवाहन माजी अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी केले. कर्जाचा ना हरकत दाखला पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावा, सातही दिवस शाखा सुरू ठेवा, अशी मागणी धोंडिराम बाबर यांनी केली. यावर तालुक्यातील दाखले संबंधित कर्जदारानेच गोळा करावेत, शहरातील दाखले पतसंस्थेचे कर्मचारी गोळा करतील. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सातही दिवस शाखा सुरू ठेवणे अशक्य असल्याचे दादासाहेब लाड यांनी सांगितले. भेटवस्तूबरोबर साबण-बाटली द्यावी, त्याचबरोबर तीन वर्षे ओळखपत्राची मागणी करूनही त्याची पूर्तता होत नसल्याबद्दल दीपक पाटील यांनी खंत व्यक्त केली. साबण-बाटलीबाबत निश्चित विचार केला जाईल, सहा महिन्यांत सभासदांच्या हातात ओळखपत्रे पोहोच केली जातील, अशी ग्वाही अध्यक्ष बाळ डेळेकर यांनी दिली. शेअर्स मर्यादा ३० हजार करा, ठेवीच्या प्रमाणात गुंतवणूक नसल्याने सिडी रेशो वाढल्याने लेखापरीक्षण वर्ग ‘ब’ मिळत असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले. सहकार कायद्यानुसार भागभांडवल २० हजारांहून अधिक वाढवता येत नसल्याचे सांगत भागभांडवल वाढले तर कर्जातील कपातीचे प्रमाण वाढेल. लेखा परीक्षणाच्या वर्गापेक्षा सभासदांचे हित महत्त्वाचे असल्याचे लाड यांनी सांगितले. यामध्ये हस्तक्षेप करत खुर्ची मागे-पुढे ठेवण्यावरून कांगावा करणारे व भागभांडवलाबाबत बोलणारे मागील संचालक मंडळात होते, त्यावेळी त्यांनी का केले नाही? अशी विचारणा एस. पी. गुरव यांनी केली.
कर्जमुक्तीची रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी महावीर चौगले यांनी केली. हा निधी चार वर्षांत टप्प्याटप्प्याने देणार असल्याचे अध्यक्ष डेळेकर यांनी सांगितले. तज्ज्ञ संचालकांची नेमणूक करताना त्यातील एक संस्थेचा सभासद, तर दुसरा वकील किंवा बॅँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ असावा, अशी मागणी आण्णाप्पा चौगले यांनी केली.
संचालक मंडळात विरोधी संचालकांना सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. संचालक मंडळाच्या फलकासह अहवालावरील फोटोंच्या क्रमात विरोधी संचालकांना शेवटी स्थान दिल्याचे राजेंद्र रानमाळे यांनी सांगितले. यावर हरकत घेत, हे प्रश्न संचालक मंडळाच्या बैठकीत बोलायचे असतात. सभासद हिताचे प्रश्न मांडा, असा टोला लाड यांनी हाणला. नोकरभरती घाईगडबडीने न करता स्टाफिंग पॅटर्नला धरूनच करावी, अशी सूचना संजय पाटील यांनी केली. कर्मचाऱ्यांचे पगार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे असल्याचे शिवाजी नाईक यांनी निदर्शनास आणून दिले. संभाजी खोचरे, सिकंदर जमाल, राजेंद्र पाटील, मनोहर पाटील, एकनाथ पाटील, अशोक कुदले, अशोक मानकर, यशवंत कांबळे, बजरंग कुरळे, आदींनी प्रश्न उपस्थित केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी आभार मानले.
खुर्चीवरून गोंधळ
व्यासपीठावर पहिल्या रांगेत पाच-सहा संचालकांना खुर्च्या ठेवल्या होत्या; पण विरोधी संचालक राजेंद्र रानमाळे यांची खुर्ची दुसऱ्या रांगेत पाहून समर्थकांनी गोंधळ सुरू केल्यानंतर रानमाळे यांनी स्वत:च पहिल्या रांगेत खुर्ची ओढून घेतली. आगामी सभेत खुर्ची मागे-पुढे वरून वाद व्हायला नको, म्हणून सर्व संचालकांना एकाच रांगेत बसविण्याची मागणी दीपक पाटील यांनी केली.
दहा वर्षांतील पहिलीच सभा
शिक्षक बॅँकेच्या सभेतील राड्यामुळे या सभेकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. परंतु, तब्बल अडीच तास सभा चालली. सभेत अनेक वेळा शाब्दिक खडाजंगी उडत होती; पण तेवढाच संयम पाळल्याने गालबोट लागले नाही. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच सभा पूर्णवेळ चालल्याची चर्चा सभास्थळी होती.