अवकाश केंद्र ‘इस्रो’च्या नकाशावर : शिवाजी विद्यापीठाचे संशोधन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:48 AM2017-12-07T00:48:12+5:302017-12-07T00:51:01+5:30
पन्हाळगडावर शिवाजी विद्यापीठाने साकारलेल्या अवकाश संशोधन केंद्रात भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम
संतोष मिठारी
पन्हाळगडावर शिवाजी विद्यापीठाने साकारलेल्या अवकाश संशोधन केंद्रात भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (आय.आर.एन.एस.एस.) या उपग्रह कार्यक्रमांतर्गत एक रिसीव्हर बसविला आहे. त्याच्यामार्फत गेल्या पावणेदोन वर्षांपासून उत्तम पद्धतीने संदेश (सिग्नल) ग्रहण केले जात आहेत. या रिसीव्हरमुळे विद्यापीठाच्या अवकाश केंद्राची ‘इस्रो’च्या नकाशावर ओळख निर्माण झाली आहे.
‘इस्रो’मधून निवृत्त झालेले प्रा. आर. व्ही. भोसले यांनी उल्कावर्षाव, खगोलशास्त्र, सौरडाग, वातावरणशास्त्र, आदींबाबतचे संशोधन, अभ्यासासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे पन्हाळगडावर अद्ययावत अवकाश संशोधन केंद्र स्थापन करण्याची संकल्पना तत्कालीन कुलगुरू डॉ. के. बी. पवार यांच्यासमोर मांडली. यानंतर सन १९९३ मध्ये डॉ. पवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी ए. आर. जैन यांच्याकडे पन्हाळगडावरील दोन एकर जागेची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला. त्यावर त्यांनी पन्हाळगडावरील पुसाटी बुरुजाशेजारी एक एकर जागेवर आरक्षण नोंदविले. यानंतर पुढील प्रशासकीय कार्यवाही होऊन १९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या केंद्राला मूर्त स्वरूप आले. अवकाश निरीक्षणासह या क्षेत्राशी निगडित विविध प्रकारचे संशोधन या केंद्रातून करण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे. त्यानुसार या केंद्रामध्ये ‘इस्त्रो’च्या आय.आर.एन.एस.एस. या उपग्रह कार्यक्रमांतर्गत एक रिसीव्हर दि. ४ मार्च २०१६ रोजी बसविण्यात आला.
‘इस्रो’च्या आय.आर.एन.एस.एस. या उपग्रह कार्यक्रमांतर्गत सात उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. त्यांपैकी पाच उपग्रह प्रक्षेपित आहेत. या सात उपग्रहांच्या साहाय्याने आपला देश आता स्वत:ची स्वतंत्र नेव्हिगेशन प्रणाली तयार करीत आहे. उपग्रहांकडून येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी देशभरात सुमारे १०५ रिसीव्हर बसविण्यात येत आहेत. त्यांपैकी २३ व्या क्रमांकाचा रिसीव्हर शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसविण्यात आला आहे.
आय.आर.एन.एस.एस. मालिकेमधील आतापर्यंत प्रक्षेपित करण्यात आलेल्या पाचही (१-ए ते १-ई) उपग्रहांकडून येणाºया संदेशांची पातळी या रिसीव्हरमध्ये उत्तमरीत्या नोंदविली जात आहे. या रिसीव्हरमुळे विद्यापीठाच्या अवकाश केंद्राने ‘इस्रो’च्या माध्यमातून भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या नकाशावर स्थान मिळविले आहे.
‘इस्त्रो’चा रिसीव्हर बसविल्याने या विद्यापीठाच्या केंद्राची भारतीय अवकाश कार्यक्रमात एक नवी ओळख निर्माण झाली आहे. यापुढे जाऊन अवकाश संशोधन करण्यासाठी ‘इस्रो’ची मदत, मार्गदर्शनानुसार उपक्रम राबविण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. शाळा ते महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांना हे केंद्र कसे उपयुक्त ठरेल, या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहेत.
- डॉ. डी. टी. शिर्के,
प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ
‘इस्रो’चा रिसीव्हर, रिव्ह्यू मीटर, वेदर स्टेशन, आदींच्या माध्यमातून संदेश आणि निरीक्षणे नोंदविण्याचे काम या केंद्रात सुरू आहे. यातून मिळणाºया माहितीचे विविध पद्धतींनी संशोधन, विश्लेषण करून त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याची सुविधा संशोधक, विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे.
- डॉ. ए. के. शर्मा,
समन्वयक, अवकाश संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ