केएसए ‘ए’ डिव्हिजन फुटबॉल लीग स्पर्धेस आजपासून प्रारंभ
By admin | Published: November 23, 2014 12:43 AM2014-11-23T00:43:27+5:302014-11-23T00:43:27+5:30
पहिला सामना दुपारी दोन वाजता
कोल्हापूर : यंदाच्या फुटबॉल हंगामाची सुरुवात कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ‘ए’ डिव्हिजन फुटबॉल लीग स्पर्धेच्या प्रारंभाने उद्या, रविवारपासून शाहू स्टेडियम येथे होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना दुपारी दोन वाजता संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब (ब) यांच्यात, तर दुसरा सामना दुपारी चार वाजता दिलबहार तालीम मंडळ (अ) विरुद्ध प्रॅक्टिस क्लब (अ) यांच्यात होणार आहे.
या लीग स्पर्धेत गतवर्षातील पात्र व नोंदणीकृत १६ संघांची गतवर्षीच्या मानांकनानुसार पहिले आठ सिनिअर संघ ‘सिनिअर सुपर-८’ गु्रपकरिता पात्र ठरले आहेत, तर बाकी आठ सीनिअर संघ ‘सीनिअर-८’ या गु्रपसाठी पात्र ठरले आहेत. या दोन गटांतर्गत स्वतंत्रपणे एकूण ५६ लीग सामने खेळले जाणार आहेत. यामधून सीनिअर सुपर-८ गु्रपमधील गुणानुक्रमे पहिले दोन संघ विजेता व उपविजेता ठरतील. सीनिअर-८ गु्रपमधील गुणानुक्रमे शेवटचे दोन संघ केएसए ‘बी’ डिव्हिजनमध्ये याचवर्षी जातील. सर्व सामने ४०-४० मिनिटांचे खेळले जाणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे पेट्रन-इन-चिफ श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे, तर यावेळी संभाजीराजे, मालोजीराजे, पोलीस निरीक्षक डी. एन. मोहिते, सीनिअर संघांचे अध्यक्ष माणिक मंडलिक, श्रीनिवास साळोखे, सुमित पाटील, अजित खराडे, विनायक फाळके, शशिकांत नलवडे, रावसाहेब सरनाईक उपस्थित राहणार आहेत.