सुरज साखरेचे पोलीस, महसूल अधिकाऱ्यांसोबत संभाषण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:02 AM2019-05-14T01:02:58+5:302019-05-14T01:03:03+5:30
एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बेकायदेशीर खासगी सावकारीच्या व्यवहारांना दिवाणी स्वरूप देऊन, त्या व्यवहारांच्या माध्यमातून ‘एसएस ...
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बेकायदेशीर खासगी सावकारीच्या व्यवहारांना दिवाणी स्वरूप देऊन, त्या व्यवहारांच्या माध्यमातून ‘एसएस गँग’चा म्होरक्या सूरज साखरेसह बाराजणांच्या टोळीने सुमारे ३६ कोटींच्या मिळकती गिळंकृत केल्याचे पोलिसांच्या गोपनीय तपासात पुढे आले आहे. साखरे याच्या सहा महिन्यांतील मोबाईल कॉल डिटेल्स आणि संभाषणाच्या चौकशीमध्ये पोलीस आणि महसूल खात्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्ह्णाचा तपास करणारे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी सखोल तपास केल्यास सावकरास बांधील सरकारी पाहुण्यांचे रॅकेट पुढे येणार आहे.
बेकायदेशीर खासगी सावकारीसह भूखंड माफियांची टोळी म्हणून ‘एसएस गँग’चा म्होरक्या सूरज साखरेसह त्याच्या सहा साथीदारांवर संघटित गुन्हेगारीच्या कलमाखाली मोक्का कारवाई करण्यात आली. संशयितांच्या घरांवर छापा टाकून त्यांच्या बेहिशेबी प्रॉपर्टीची कागदपत्रेपोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामध्ये त्याच्यासह साथीदारांनी सुमारे ३६ कोटींची मिळकत गोरगरीब लोकांच्या सावकारकीच्या व्याजापोटी गिळंकृत केल्याचे निदर्शनास आले आहे.
साखरेचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले असता त्यामध्ये पोलीस आणि महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाºयांशी त्याचे वारंवार संभाषण झाल्याचे दिसून आले आहे. हे अधिकारी, कर्मचारी कोण? त्यांच्याशी साखरे याचे कोणत्या व्यवहाराशी संभाषण झाले? अनेक गुन्ह्णांमध्ये त्याला अटक न करता तो जामिनावर बाहेर फिरत होता. त्याने व्याजाने पैसे घेतलेल्या लोकांच्या नावे बनावट कागदपत्रेतयार करून भरमसाट कर्ज घेतल्याचेही तपासात पुढे आले आहे.
कुटुंब रस्त्यावर, पोलिसांकडून तक्रार घेण्यास नकार
मिलिंद जयसिंगराव गाडे यांची कसबा बावडा येथील न्याय संकुलाच्या मागे १८ गुंठे जागा होती. त्यांनी ती एका बांधकाम व्यावसायिकाला विकली. व्यवहारामध्ये त्यांना २५ लाख आणि एक फ्लॅट देणे बंधनकारक होते. त्यांनी रंकाळा परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये ७० लाखांच्या फ्लॅटचा व्यवहार केला. त्यामध्ये ते राहू लागले. कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी सूरज साखरेकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले. साखरे याने संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून २२ लाख रुपये घेऊन ते गाडे यांना देऊन त्यांचा रंकाळा येथील आलिशान फ्लॅट ताब्यात घेतला. चौकशी केली असता ते २२ लाख गाडे यांच्या कसबा बावडा येथील विक्री केलेल्या जागेचे होते. आपली फसवणूक झाल्याचे समजताच गाडे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची कोणीच दाद घेतली नाही. गाडे हे कुटुंबासह बुधवार पेठ येथील भाड्याच्या घरामध्ये राहतात. साखरेमुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत, पोलीस अधीक्षकांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी गाडे कुटुंबीयांकडून होत आहे.
दोषारोपपत्र दाखल नाही
बांधकाम व्यावसायिक धीरज साखळकर यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचा फ्लॅट आणि साहित्य जबरदस्तीने ताब्यात घेतल्याप्रकरणी सूरज साखरेवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या घटनेला सव्वा वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलेले नाही. साखळकर पाठपुरावा करतात, परंतु पोलीस लक्ष देत नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे.