स्वप्निलच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:41 AM2018-04-02T00:41:02+5:302018-04-02T00:41:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरचा युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांचे ‘श्वेतबंध’ हे चित्रांचे प्रदर्शन आज, सोमवारपासून मुंबईत भरत आहे.
मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये २ ते ८ एप्रिल या कालावधीत हे प्रदशर््न भरणार आहे. स्वप्निल यांचे हे सहावे चित्रप्रदर्शन आहे, तर स्वप्निल यांचे पहिले चित्रप्रदर्शन कोल्हापुरात रत्नाकर आर्ट गॅलरीत भरले तेव्हा त्यांचा १८ वा वाढदिवस होता. योगायोगाने त्यांच्या या सहाव्या चित्रप्रदर्शनाची सुरुवातही २ एप्रिलला त्यांच्या २५ व्या वाढदिवशीच होत आहे. या चित्रप्रदर्शनात समाविष्ट असलेली ३0 तैलरंगातील चित्रे ही गेल्या आठ वर्षांच्या चित्रप्रवासात त्यांना आलेले चांगले-वाईट अनुुभव, विचारांतून, वाचनातून, पाहण्यातून जे विषय सुचले त्यावर आधारित आहेत. ‘श्वेतबंध’ या नावाने हे चित्रप्रदर्शन जहाँगीर आर्ट गॅलरीसारख्या प्रतिष्ठेच्या गॅलरीमध्ये भरत आहे.
मूळचे करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथील स्वप्निल पाटील यांना आतापर्यंत २0१0 मध्ये ‘लोकमत’ आयोजित श्लोक प्रदर्शनात, २0११ मध्ये नागपूर येथील साऊथ सेंट्रल झोन कल्चर सेंटर, २0१३ मध्ये चंद्रकांत मांडरे कला अकादमी कोल्हापूरतर्फे लँडस्केपसाठी, तसेच कोल्हापूरच्याच पी. डी. धुंदरे फौंडेशनतर्फे लँडस्केपसाठी पुरस्कार मिळालेले आहेत.
दिवसा बिल्डिंगला रंग आणि रात्री अभ्यास
स्वप्निल पाटील यांनी प्रसंगी भिंती रंगवत अभ्यासक्रम पूर्ण केला. दिवसा बिल्डिंग रंगविणे आणि रात्री अभ्यास करीत कला महाविद्यालयातील चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार यांच्यासोबतचे गुरू-शिष्याचे नाते जडले त्यातून चित्रकलेचे ज्ञान मिळविले. हा प्रवास कोल्हापूर ते मुंबई असा आजतागायत सुरू आहे.