कोल्हापुरातून ‘टेक आॅफ’ पुन्हा लांबणीवर, धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 07:34 PM2017-12-12T19:34:15+5:302017-12-12T19:39:54+5:30
कोल्हापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार शुक्रवार (दि. १५) पासून कोल्हापूरमधून प्रवासी विमानाचे टेक आॅफ होण्याची आशा होती. मात्र, रनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम आणि विमान उपलब्धतेअभावी विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा केव्हा सुरू होणार, हा कोल्हापूरवासीयांना प्रश्न पडला आहे. संबंधित योजनेतील समावेशानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट (वेळ) या कारणास्तव विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत होता.
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालय यांच्यातर्फे दि. २५ आणि २६ आॅक्टोबरला कोल्हापूरच्या विमानतळाची पाहणी केली. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर ‘डीजीसीए’कडून कोल्हापूर विमानतळाला प्रवासी वाहतूक परवाना देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
या विमानसेवेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून खासदार संभाजीराजे यांनी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली. यावेळी मंत्री अशोक गजपती राजू यांनी दि. १५ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याची ग्वाही दिली; पण याबाबतचे सध्याचे वास्तव पाहता विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.
कोल्हापुरातून विमानसेवा पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या कंपनीकडे साधारणत: दि. १८ डिसेंबरपर्यंत विमान उपलब्ध होईल. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महिना अखेरपर्यंत कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धावपट्टी रविवारपर्यंत बंद
सध्या विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू आहे. त्यामुळे रविवार (दि. १७) पर्यंत धावपट्टी अधिकृतरीत्या बंद राहणार आहे. या दरम्यान, वातावरण ढगाळ राहिल्यास धावपट्टी बंद राहण्याचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.