कोल्हापुरातील पंचगंगा नदीत बस कोसळली; १३ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 01:29 AM2018-01-27T01:29:31+5:302018-01-27T14:46:23+5:30
सहा वर्षानंतर मुलगा झाला म्हणून नवस फेडायला गेलेले कुटुंब गणपतपुपुळ्याहून परतताना येथील शिवाजी पूलावर चालकाचे मिनीबसवरील नियंत्रण सुटल्याने गाडी शंभर फूट खाली पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील बालेवाडी व पिरगुंट येथील एकाच कुटुंबातील १२ जण पाण्यात गुदमरून ठार झाले. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले.
कोल्हापूर : सहा वर्षानंतर मुलगा झाला म्हणून नवस फेडायला गेलेले कुटुंब गणपतीपुळ्याहून परतताना येथील शिवाजी पूलावर चालकाचे मिनीबसवरील नियंत्रण सुटल्याने गाडी शंभर फूट खाली पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील बालेवाडी व पिरगुंट येथील एकाच कुटुंबातील १२ जण पाण्यात गुदमरून ठार झाले. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले.
या अपघातग्रस्त गाडीत एकूण १६ लोक होते. त्यातील चालकासह तीन महिला, चार मुली, तीन मुले व दोन कर्ते पुरुष असे तब्बल १३ ठार झाले. त्यामध्ये भरत सदाशिव केदारी (वय ६८ रा.बालेवाडी ता. हवेली. जि पुणे) यांचा मुलगा, दोन सुना, मुलगी,एक जावई व सात नातवंडे जागीच ठार झाले. माझे सारे कुटुंबच देवाने हिरावून नेले आता मी तरी कशाला जगायचे म्हणून भरत केदारी यांनी फोडलेला टाहो काळीज चिरणारा होता. अपघाताची नोंद करवीर पोलिसांत झाली.
भरत केदारी यांचा मुलगा सचिन हा कुटुंबातील अत्यंत लाडका. त्याला सर्वजण ‘भावड्या’ म्हणून बोलवत असत. त्याला आठ वर्षाची संस्कृती नावांची मुलगी आहे. परंतू त्यानंतर आता नऊ महिन्यापूर्वी मुलगा झाला. त्याचे नांव सानिध्य. मुलगा झाल्यावर गणपतीपुळे येथील गणरायाच्या चरणी माथा टेकून बाळाला देवाच्या पायावर घालण्याचे नवस वडिलांनी केले होते. त्यानुसार केदारी, वरखडे आणि नागरे कुटुंबिय शुक्रवारी पहाटे पाच वाजता बालेवाडीहून साई ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी मिनीबसमधून (क्रमांक एमएच१२-एनएक्स ८५५६) निघाले. दुपारनंतर ते गणपतपुळ्याला पोहचले.
देवदर्शन झाल्यावर ५.१५ वाजता सचिनने वडिलांना फोन केला व दर्शन झाले असून आम्ही आता कोल्हापूर येथे आज रात्री थांबतो व शनिवारी अंबाबाई,जोतिबा करून रविवारी पुण्याला येतो असे सांगितले. येताना वाटेतच त्यांनी रत्नागिरीला ओळखीच्या आजींकडे जेवण घेतले व त्यांचा प्रवास सुरु झाला. रात्री अकराच्या सुमारास चालकांने वाघबीळाजवळ थोडावेळ गाडी थांबवली. आणि पुन्हा स्टार्टर मारला.
रात्री ११.३० सुमारास कोकणातून कोल्हापूरकडे एसटी बस येत होती. त्याच दरम्यान या मिनीबसच्या चालकांने तिला ओव्हरटेक केला व त्याचवेळी नेमका एक मोटारसायकलस्वार समोरून आल्याने त्याला चुकविण्याच्या नादात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ही मिनीबस उजव्याबाजूचा तब्बल पंधरा फूटाचा पूलाचा मजबूत दगडी कठडा फोडून शंभर फूट पंचगंगा नदीत कोसळली. पंचगंगा घाटाकडील बाजूला ही बस कोसळली.
कोसळताना बस पहिल्यांदा नदीच्या काठावरील खडकांवर समोरील बाजूने आपटल्याने प्रचंड मोठा आवाज झाला. व त्या धक्क्याने बसचा मागील दरवाजा उघडला गेला. खडकावरून आदळून ती पाण्यात कोसळल्यावर गाडीतील लोक जागे झाले व त्यांतील कांहीनी वाचवा..वाचवा अशा जोरदार आवाजात मदत मागितली. त्याचवेळी तोरस्कर चौकात हिप्नॉटिझमचा कार्यक्रम पाहत बसलेले संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळाचे कार्यकर्ते कुणाल भोसले व माजी उपमहापौर दिगंबर फराकटे हे कार्यकर्त्यासह मदतीला धावले व त्यांनी तिघांना बाहेर काढून तातडीने सीपीआर रुग्णालयात पाठविले. बसमध्ये पाणी जाईल तशी ती बुडाल्याने उर्वरित लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यातील बहुंताशी झोपेतच होते.
अपघाताचे वृत्त समजताच पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर स्वाती यवलुजे, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, ऋतुराज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक एल.एस.पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली व मदत कार्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.
नदीत कोसळलेली बस काढण्यासाठी मोठ्या क्षमतेची क्रेन वेळेत उपलब्ध न झाल्याने गाडी बाहेर काढण्यास विलंब झाला. त्यामुळे गाडीत नक्की किती लोक होते याचाही अंदाज आला नाही. पहाटे ३.२० वाजता गाडी बाहेर काढण्यात आली व त्याचवेळी मृतदेह बाहेर काढून सीपीआरला पाठविण्यात आले. परंतू जखमीपैकी कोण पुरेशा चांगल्या स्थितीत नसल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी विलंब झाला.
भरत केदारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नेताजी गांडेकर व त्यांचे अन्य सर्व नातेवाईक पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरात आले व मग मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आमदार सतेज पाटील यांनी रात्रीच यंत्रणा कामाला लावून १२ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली होती त्यातून हे मृतदेह दुपारी बारानंतर पुण्याला नेण्यात आले.
‘सानिध्य’च नाही राहिला..!
आपल्या लाडक्या भावाला नवसाने मुलगा झाला. त्यात प्रजासत्ताक दिनाच्या जोडून सुट्या आल्याने दोन बहिणींसह सर्वांनीच एकत्र जावून नवस फेडायचे व तेवढीच सहलही होईल या बेताने हे कुटुंबीय बाहेर पडले परंतू नियतीच्या मनांत वेगळेच कांही होते. ज्या बाळासाठी हे नवस बोलले होते, तो नऊ महिन्यांचा ‘सानिध्य’ही अपघातात ठार झाला व त्याचा मृतदेह सुरुवातीला मिळत नव्हता. तो पंचगंगा नदीतून सकाळी सातच्या सुमारास बाहेर काढला.
मृतांची नांवे अशी :
१) सचिन भरत केदारी (वय ३४ रा. बालेवाडी) त्यांची पत्नी निलम (वय २८), मुलगी संस्कृती (वय ८), मुलगा सानिध्य (वय ९ महिने) त्यांची भावजय भावना दिलीप केदारी (वय ३५) पुतण्या साहिल केदारी (वय १४), पुतणी श्रावणी (वय ११) बहिण छाया दिनेश नागरे (वय ४१) भाचा प्रतिक नागरे (वय १४), दूसऱ्या बहिणीचे पती संतोष बबनराव वरखडे (वय ४५ रा. पिरगुंट ता. मुळशी जि. पुणे) भाची गौरी (वय १६ व ज्ञानेश्वरी (वय १४). चालक : महेश लक्ष्मण कुचेकर (वय ३२ रा पुणे)
जखमींची नांवे अशी :
सचिन यांची आई मंदा भरत केदारी (वय ५०), भाची प्राजक्ता दिनेश नागरे (वय १८ रा दोघीही बालेवाडी. ता. हवेली.) आणि बहिण मनिषा संतोष वरखडे (रा.पिरगुंट ता.मुळशी).
बापलेक आल्यावर उलगडा
भरत केदारी व त्यांचा मुलगा दिलीप हे पहाटे सीपीआर रुग्णालयात आल्यावर मृतांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. दिलीप हे खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड आहेत. हे दोघे बापलेक घरी थांबून सगळ्याना देवदर्शनाला पाठविले आणि ही दूर्घटना घडली.
पुलाच्या बांधकामाबाबत संतप्त प्रतिक्रिया
कोल्हापूर-रत्नागिरी या राज्य मार्गावर कोल्हापूर शहराला लागूनच पश्चिमेकडील बाजूस असलेल्या शिवाजी पूलावर हा अपघात झाला. त्याचे बांधकाम १८८० ला इंग्रजांनी केले आहे. त्याची आर्युमर्यादा संपल्याने दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नातून पर्यायी पूल मंजूर होवून त्याचे बांधकामही ७० टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहे. परंतू पुढे पूल मार्गावर येणाऱ्या जुन्या पाण्याच्या हौदाचे बांधकाम पाडण्यात पुरातत्व विभागाने हरकत घेतल्याने हे काम तीन वर्षे रखडले आहे. त्याबध्दल लोकांत संतप्त प्रतिक्रिया असून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही घटनास्थळी त्याबाबतच्या रोषाला सामोरे जावे लागले. या घटनेने रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या अपघाताच्या आठवणीही जाग्या झाल्या.
आतापर्यंतचा मोठा अपघात
कोल्हापूर शहर किंवा परिसरातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात मानला जातो. शिवाजी पूलावर यापूर्वीही किरकोळ अपघात झाले परंतू त्यात जिवितहानी झाली नव्हती. कोल्हापूरात यापूर्वी आॅगस्ट १९९९ मध्ये केएमटी बस बालिंग्याजवळ भोगावती नदीत कोसळून ६ ठार झाले होते. पन्हाळा तालुक्यातील बोरगांवजवळच्या वाळोली बंधाऱ्यावरून पॉवरट्रिलर कासारी नदीत कोसळूनही असाच अपघात झाला होता.