प्रश्नपत्रिकेतील मजकूर प्रसारित : तिघांची चौकशी, कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:58 AM2017-11-23T00:58:13+5:302017-11-23T01:00:43+5:30
कोल्हापूर : मॅकेनिकल विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी मिळताजुळता मजकूर व्हॉटस्अॅपवरून प्रसारित केल्याच्या संशयावरून तीन विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठाने बुधवारी चौकशी केली.
कोल्हापूर : मॅकेनिकल विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी मिळताजुळता मजकूर व्हॉटस्अॅपवरून प्रसारित केल्याच्या संशयावरून तीन विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठाने बुधवारी चौकशी केली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून चौकशीची कार्यवाही करण्यात आली.
विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेतील अभियांत्रिकी विद्याशाखेतील काही विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील मजकूर हा पेपरपूर्वी आणि नंतर व्हॉटस्अॅपवरून प्रसारित होत असल्याची निनावी तक्रारी परीक्षा विभागाकडे आल्या होत्या. यानुसार संबंधित स्वरुपातील चौकशी या विभागाकडून सुरू होती.
याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले, विभागाकडून गोपनीयपणे चौकशी सुरू होती. यात अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल विषयाच्या पाचव्या सत्रातील पेपरमधील प्रश्नांबाबतचा काही मजकूर प्रसारित झाल्याचे बुधवारी आढळले. या अनुषंगाने तीन विद्यार्थ्यांची चौकशी केली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांनादेखील बोलवून घेतले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. ते प्रकरण विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीसमोर ठेवून दोषी सापडल्यास त्यांच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई केली जाईल. प्रश्नपत्रिका वितरणासाठी परीक्षा मंडळाने राबविलेली ‘एसआरपीडी’ पद्धती अत्यंत गोपनीय आहे. या गोपनीयतेचा जर कोणी भंग केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
बुधवारी मॅकेनिकलच्या पाचव्या सत्रातील प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी मिळताजुळता मजकूर व्हॉटस्अॅपद्वारे प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. त्याबद्दल संशयावरून परीक्षा मंडळाने तीन विद्यार्थ्यांची चौकशी केली. काही विषयांच्या पेपरमधील प्रश्नांशी मिळताजुळता मजकूर व्हॉटस्अॅपवरून प्रसारित होत असल्याच्या निनावी तक्रारी विभागाकडे आल्या होत्या.