ठोकायचे तिथे ठोका परंतू गुंडगिरी मोडा, विश्वास नांगरे-पाटील यांचे कोल्हापुरात आदेश,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 06:25 PM2017-12-14T18:25:39+5:302017-12-14T18:43:04+5:30

फुटबॉल तालीम मंडळाच्या वादातून एका अल्पवयीन मुलाची हत्या होते, ही बाब लांच्छनास्पद आहे. अशा गुंडांविरोधात गुंडांविरोधी पथकाची निर्मिती करा. ज्याला जशी भाषा समजते अशांना ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतिचा वापर करून त्यांची गुंडागर्दी मोडून काढा, असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी गुरुवारी दिले.

There is a knock on the thumb but the order of Gundagiri Moda, Vishwas Nangre-Patil | ठोकायचे तिथे ठोका परंतू गुंडगिरी मोडा, विश्वास नांगरे-पाटील यांचे कोल्हापुरात आदेश,

हंगामी फुटबॉल हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने गुरुवारी पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.(छाया : दीपक जाधव)

googlenewsNext
ठळक मुद्देतालीम मंडळांच्या प्रतिनिधींबरोबर बैठकीत सूचनागुंडाविरोधी पथके स्थापन कराडिजीटलवर झळकणाऱ्यांची यादी कराराजकीय दबावाची भिती नको‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतिचा वापर करून गुंडागर्दी मोडून काढा

कोल्हापूर : फुटबॉल तालीम मंडळाच्या वादातून एका अल्पवयीन मुलाची हत्या होते, ही बाब लांच्छनास्पद आहे. अशा गुंडांविरोधात गुंडांविरोधी पथकाची निर्मिती करा. ज्याला जशी भाषा समजते अशांना ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतिचा वापर करून त्यांची गुंडागर्दी मोडून काढा, असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी गुरुवारी दिले.

दोन दिवसांपूर्वी गांधी मैदान येथे झालेल्या अल्पवयीन तरुणाच्या हत्येनंतर व फुटबॉल हंगामाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील २७ तालीम मंडळांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

नांगरे-पाटील म्हणाले, ‘सतरा वर्षाच्या मुलाची हत्या होते. ही घटना या नगरीला लांच्छनास्पद आहे. मला इथली नस माहिती आहे.अशा कारवाया करण्यासाठी पाठीमागून प्रोत्साहन देणाऱ्यांवर १२० (ब) नुसार गुन्हे दाखल करा. येत्या काही दिवसांत यंदाचा फुटबॉल हंगाम सुरू होत आहे. त्यादृष्टीने अशा घटना टाळण्यासाठी गुंडा प्रतिबंधक पथकाची निर्मिती करा.

ज्यांच्या नावाने शिवाजी पेठ व महात्मा गांधीजी यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या गांधी मैदानात ही दुर्दैवी घटना घडते ही बाब निश्चितच निंदनीय आहे. सर्वांनीच याबाबत अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. जिथे प्रबोधनाची गरज आहे. त्या ठिकाणी आमचे पोलीस ते करतीलच. त्याशिवाय जिथे ठोकण्याची गरज आहे त्या ठिकाणीही बघ्याची भूमिका न घेता कारवाई करतील, तशा सूचना मी दिल्या आहेत. यावेळी उपस्थित तालीम मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मत मांडले.


यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक सर्वश्री अनिल गुजर, तानाजी सावंत, संजय साळोखे, अशोक धुमाळ, शशीराज पाटोळे व बालगोपाल तालमीचे अध्यक्ष निवासराव साळोखे,शिवाजी तरुण मंडळाचे सुजित चव्हाण, दिलीप सूर्यवंशी,लालासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे,सणगर गल्ली तालीमचे बाबा पार्टे, स्वप्निल पार्टे, सुबराव गवळी तालीमचे रमेश मोरे, आदिल फरास, जुना बुधवार तालीमचे धनंजय सावंत, रणजित शिंदे, अवचितपीर तालीमचे मनजित माने,अमित चव्हाण,या प्रमुख उपस्थितांसह बाराईमाम तालीम, बाबुजमाल तालीम, पाटाकडील तालीम आदी संस्थाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय दबावाची भिती नको

शहरात आता कुणाचीही गय केली जाणार नाही. राजकीय दबाव झुगारून कामाला लागा. याबाबत काही तक्रार आल्यास मी त्याला तोंड देण्यास सज्ज आहे, असेही नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे बजावले.

डिजीटलवर झळकणाऱ्यांची यादी करा

गळ्यात मोठ्या सोन्याच्या चेन घालून डिजीटल फलकांवर झळकणाऱ्यांचीही यादी तयार करा. किरकोळ मारामारीचे गुन्हे नोंदविले जात नाहीत; यापुढे ते गुन्हे नोंदवा. त्यातून ही गुंडागर्दी संपेल. याकरिता तालीम, संस्थांच्या ज्येष्ठ मंडळींनीही साथ दिली पाहिजे. छत्रपती शिवरायांचा पराक्रम ही सर्वश्रुत आहे.

तुम्हीच प्रबोधन करा

लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काही वेळा कार्यकर्त्यांच्या मुलांना गल्लीतील मारामारीसाठी पोलीस ठाण्याला सोडवायला येतो, अशी कबुली माजी नगरसेवक आदिल फरास यांनी दिली; पण समाजात सर्वांना घेऊन काम करावे लागते. साहेब, तुम्हीच समाजात परिवर्तन करू शकता. तुम्ही सर्व शाळा, तालीम संस्थांमध्ये भेटी देऊन प्रबोधन करा, अशी विनंती फरास यांनी विश्वास नांगरे-पाटील यांना केली.

पोलिसांचा दबाव हवा

फुटबॉल सामन्यांदरम्यान खेळाडूंना चिथावणी दिले जाते. त्यामुळे खेळाडूही प्रतिस्पर्धी खेळाडूला शिवीगाळ व प्रसंगी मारहाणही करतात. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. अशांवर कारवाई करा, अशी सूचना के. एस. ए.चे पदाधिकारी संभाजी पाटील-मांगोरे यांनी केली.

किमान पंधरा दिवसांतून एकदा तालीम मंडळांशी संवाद

मंगळवार (दि. १२)च्या घटनेतील एका संशयिताला खंडोबा तालमीकडून खेळण्यासाठी दहशत निर्माण केली जात होती. हा संशयित पूर्वी शिवाजी तरुण मंडळाकडून खेळत होता. त्यातून त्याला मारहाण केली जाणार होती, ही बाब पुढे आली आहे. त्यामुळे अशा मंडळांच्या पाठिराख्यांवरही कडक कारवाई केली जाईल. याबाबत त्यांनी फुटबॉल स्पर्धेदरम्यान झालेल्या घटनांची यादी दाखविली.

यापूर्वी पोलिसांचा दबाव केवळ गणेशोत्सव व नवरात्रौत्सवीदरम्यान येत होता. आता किमान पंधरा दिवसांतून एकदा तालीम मंडळांशी पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक संवाद साधतील. यापुढे शहरातील गुंडागर्दी संपवून टाकू, अशीही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

सतरा वर्षांच्या मुलाची हत्या झाल्यानंतर गेले दोन दिवस मी अस्वस्थ झालो आहे. दोन दिवस मला झोप लागली नाही. ज्या ठिकाणच्या हद्दीत ही घटना घडली, त्या अधिकाऱ्यालाही झोप लागायला नको. नाहीतर असा अधिकारी निर्ढावलेला समजला जाईल, अशाही भावना नांगरे-पाटील यांनी व्यक्त केल्या.

नांगरे-पाटील यांनी दिलेल्या आदेशवजा सूचना अशा,

  1. - वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली १०० जणांच्या गुंडाविरोधी पथकाची निर्मिती करा.
  2. - युवकांचे आयडॉल ठरू पाहणाऱ्या व दागदागिने घालून डिजिटल फलकांवर झळकणाऱ्यांची यादी बनवून त्यांच्यावरही कारवाई करा.
  3. - शाळा कॉलेजच्या प्राचार्यांची बैठक बोलावून ड्रेस कोड व आयकार्डबाबत सूचना द्या.
  4. - किरकोळ मारामारीतही गुन्हे दाखल करा.
  5. - रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी करा.
  6. - बघ्याची भूमिका नको. थेट कारवाई करा.
  7. - सायलेन्सर, कर्कश हॉर्न वाजवत फिरणाऱ्या युवकांवरही कारवाई करा.
  8. - प्रत्येक तालीम मंडळांसाठी एक कॉन्स्टेबल लायझन आॅफिसर म्हणून नेमा.
  9. - अवैध धंदेवाल्यांना चाप बसण्यासाठी प्रत्येक वॉर्डात १० महिलांची समिती स्थापन करा. विशेषत: ओपन बारला चाप बसेल.
  10. - महिलांच्या छेडछाडप्रकरणी प्रबोधन करण्याचे दिवस संपले असून थेट कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी ‘निर्भया’ पथकाला दिले.
  11. - सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, अश्लील उल्लेख, सार्वजनिक ठिकाणी तलवारीसारखी शस्त्रे घेऊन केक कापून वाढदिवस साजरे करणाºयांसह अशा पोस्ट करणाऱ्या गु्रपसह अ‍ॅडमिनवरही गुन्हा दाखल करा.
  12. - अल्पवयीन मुलांना पुढे करून कारवाई करणाऱ्या पालकांवर आता कारवाई करा.

 

 

Web Title: There is a knock on the thumb but the order of Gundagiri Moda, Vishwas Nangre-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.