गुळाचे दर ५०० रुपयांपर्यंत पडले; व्यापाºयांची खेळी : शेतकºयांमधून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 10:55 PM2017-11-16T22:55:48+5:302017-11-16T22:57:40+5:30
कोल्हापूर : मागणी होत नसल्याचे कारण पुढे करीत व्यापाºयांकडून ३०० ते ५०० रुपयांपर्यंत गुळाचे दर पाडले जात आहेत.
कोल्हापूर : मागणी होत नसल्याचे कारण पुढे करीत व्यापाºयांकडून ३०० ते ५०० रुपयांपर्यंत गुळाचे दर पाडले जात आहेत. गेल्या आठ दिवसांतील हे चित्र असून, व्यापाºयांच्या या खेळीकडे शेती उत्पन्न बाजार समितीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गुरुवारी बाजार समितीत एक किलो वजनाच्या रव्याचे सात हजार ७८७ बॉक्सची आवक झाली. याला प्रतिक्विंटल तीन हजार ७०० ते चार हजार ५०० रुपये दर मिळाला. हा दर सरासरी चार हजार १०० इतका आहे. दहा किलो वजनाच्या ३९ हजार ५९० रव्यांची आवक झाली. याला तीन हजार ५०० ते चार हजार ७७० इतका दर मिळाला. सरासरी प्रतिक्विंटल तीन हजार ९०० रुपये इतका दर यावेळी मिळाला. यावरून आठ दिवसांपूर्वी गुळाला मिळालेल्या दराच्या तुलनेत प्रतिक्विंटल सरासरी ३०० ते ५०० रुपये कमी राहिला. यावरून व्यापाºयांकडून दर पाडण्याचा घाट घातला जात आहे.
गुळाला फक्त मुहूर्ताच्या सौद्या पुरताच दर मिळतो. दसरा, दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर निघणाºया सौद्यांमध्ये उच्चांकी दर, त्यानंतर मात्र दर आपोआपच गडगडतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदाही हेच चित्र आहे. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये उच्चांकी पाच हजार १५१ रुपयांपर्यंत दर गेला होता. त्यानंतर काही दिवस सरासरी ४७०० ते ५००० रुपये इतका दर स्थिर राहिला होता. यामध्ये एक किलोच्या गुळाला पाच हजार १०० ते पाच हजार २०० रुपये इतका दर होता. दहा किलोच्या रव्याला सरासरी चार हजार ८०० ते चार हजार ९०० इतका दर मिळाला.परंतु, गेल्या आठ दिवसांपासून गुळाचे दर घसरत चालले आहेत. दररोज शंभर ते दोनशे रुपयांनी दर कमी होत आहे.