कोल्हापूर विमानतळाला ‘टुबी’ परवाना धनंजय महाडिक : वाहतूक संचालनालयाने पाठविली प्रत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:19 AM2017-12-16T00:19:51+5:302017-12-16T00:20:49+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरातून विमान वाहतूक सुरू होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला ‘टूबी’ हा डे आॅपरेटिंग परवाना प्रलंबित होता.
कोल्हापूर : कोल्हापुरातून विमान वाहतूक सुरू होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला ‘टूबी’ हा डे आॅपरेटिंग परवाना प्रलंबित होता. तो पूर्वनिर्धारित १६ डिसेंबर या तारखेच्या मुदतीपेक्षा एक दिवस आधी मिळाला आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली.
एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्ली येथील सेंट्रल हेडक्वार्टर येथे या परवान्याची प्रत पाठविली असल्याचे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे बी. एस. भुल्लर यांनी कळविले आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून डे आॅपरेशन्स निर्धारित वेळेत सुरू होणार, हे निश्चित झाले आहे. डे आॅपरेटिंग परवाना मिळविण्यासाठी कोल्हापूर विमानतळाच्या अधिकारी पूजा मूल व कर्मचाºयांनी विशेष प्रयत्न केले. कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा प्रारंभ २४ डिसेंबरपासून होणार आहे. यापूर्वी बुधवारी (दि. २०) विमानोड्डाणाची पूर्वचाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी हा परवाना मिळणे महत्त्वाचे आहे. या परवान्यासाठी मी आग्रही होतो, अशी माहिती महाडिक यांनी दिली.
विमानाने जाण्यासाठी शंभरजण उत्सुक
तब्बल सहा वर्षांनंतर कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरला सुरू होणार आहे. या पहिल्या विमानाने जाण्यासाठी शंभरजण उत्सुक आहेत. त्यांनी प्राथमिक स्वरुपातील नोंदणी विविध प्रवासी वाहतूक सेवा पुरविणाºया संस्थांकडे केली आहे. विमानसेवा प्रारंभाबाबत कोल्हापूरकरांमध्ये उत्साह आहे.
कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी ‘एअर डेक्कन’चे १८ आसनी विमान असणार आहे. ‘उडान’अंतर्गत यातील पहिल्या दहा जागांचा तिकीट दर अडीच हजार ते तीन हजार रुपये असणार आहे. उर्वरीत आठ जागांसाठी सहा ते सात हजार रुपये दर असेल.
दरम्यान विमानसेवेसाठी तिकीट नोंदणीची प्रक्रिया आॅनलाईन असणार आहे. एअर डेक्कन कंपनीचे संकेतस्थळ अथवा तिकीट नोंदणीची सेवा देणाºया अॅप्सचा वापर करावा लागणार आहे. अधिकृतरीत्या नोंदणीची प्रक्रिया २१ डिसेंबरपासून सुरू होईल. येथील उद्योजक, व्यापारी आणि कोल्हापूरकरांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा. नियमितपणे येथे सेवा सुरू राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया ट्रेड विंग्ज् लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक बी. व्ही. वराडे यांनी दिली.