उध्दव ठाकरेंचे सरकारबरोबर पटत नाही मग ते घटस्फोट का घेत नाही ? - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 05:28 PM2017-12-08T17:28:10+5:302017-12-08T17:33:00+5:30
राज्यात नवीन पक्षाची आवश्यकता होती. ती उणीव भरुन काढण्यासाठी मी नवीन पक्ष काढला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा आहे.
कोल्हापूर - राज्यात नवीन पक्षाची आवश्यकता होती. ती उणीव भरुन काढण्यासाठी मी नवीन पक्ष काढला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा आहे त्यामुळे राज्यातून अनेक जण माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्यास इच्छुक आहेत असे नारायण राणे शुक्रवारी म्हणाले. पक्ष स्थापनेनंतर नारायण राणे यांनी कोल्हापूरातून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. आज संध्याकाळी कोल्हापूरात नारायण राणे जाहीरसभा घेणार आहेत. त्यातून ते पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट करतील.
आज पत्रकारांशी बोलताना त्यांना शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. कोल्हापूरात आपल्याला शिवसेनेच्या आमदारांची संख्या शुन्य करायची आहे असे नारायण राणे म्हणाले. उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का?, उध्दव ठाकरे यांना कोणत्याही खात्याची माहिती नाही. उध्दव ठाकरे यांना सरकारचे पटत नसेल तर घटस्फोट का घेत नाही ? सरकार बरोबर नाक घासत तीन वर्षे काढली नाना पटोलेकडून काहीतरी घ्यावे असा टोला त्यांनी उद्धव यांना लगावला.
विधानपरिषदत पोटनिवडणुकीत मत फुटणारच होती असे नारायण राणे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण आपल्या संपर्कात आहेत असेही त्यांनी सांगितले. नाना पटोलेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना म्हणाले कि, नाना पटोलेंनी कुठे जाव, काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही. ते आधीपासूनच भाजपावर नाराज होते असे नारायण राणे म्हणाले. सरकारवर जनता नाराज असेल तर आम्ही जनते बरोबर राहू असे त्यांनी सांगितले. माझा पक्ष लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकील्ला आहे. मुलाचा राजीनामा हा त्याच नुकसान ठरेल असे राणे म्हणाले.